
नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा ‘अल्टिमेटम’ ना. श्री. गडकरी यांनी संबंधित कंपनीला दिला.
डिसेंबर २०२३ मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या कारपेटिंगची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १ मे २०२४ ला के. जी. गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी ना. श्री. गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे.
त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत ना. श्री. नितीन गडकरी यांनी धावपट्टीच्या कामाची सोमवारी (दि. २३ डिसेंबर) पाहणी केली. यावेळी आमदार मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, मिहानच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, विमानतळ प्राधिकरणारे अधिकारी तसेच के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
कंपनीला मे २०२४ मध्ये कार्यादेश मिळाल्यावर जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. पहिल्या लेअरचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम पूर्ण होण्यासाठी २१ मे २०२५ पर्यंतचा कालावधी लागेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
ना. श्री. गडकरी यांनी धावपट्टीचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी आणखी पाच महिने सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागणे योग्य नाही, याकडेही मिहान व कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट इशारा ना. श्री. गडकरी यांनी दिला.









