नागपूर: बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक चळवळीचे वारसदार आहेत. ते खंबीरपणे बाबासाहेबांच्या विचारांच्या सोबत असायचे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे दलित चळवळीत मोठे योगदान असून बॅरिस्टर साहेबांच्या जन्म शताब्दी वर्ष महोत्सव मोठया प्रमाणात वर्ष भर साजरे करण्यात येणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.
आंबेडकरी आंदोलक, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभेचे पूर्व उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्म शताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२४ पासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने २५ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी महोत्सव व्यापक प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाकरिता आज डॉ. राऊत यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वर्षभर साजरे होणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारवंत, साहित्यिक, देशातील विधिमंडळ आणि संसद सदस्य, कलावंत व संशोधक अशा विविध स्तरावरील मान्यवरांचा सहभाग असणार आहे. सदर महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निमित्ताने देश-विदेशातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या समावेशक बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.
प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी प्रा. अशोक गोडघाटे यांनी यावेळी दूरध्वनीवरून बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत आंबेडकरी विचारवंत ताराचंद खांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल नगरारे, रिपब्लिकन नेते तथा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे पुतणे प्रवीण खोब्रागडे, चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिव एन.टी.मेश्राम, भीमराव वैद्य, निरंजन बोंडे, बॅरि.खोब्रागडे मेमोरियल ट्रस्टचे अशोक कोल्हटकर, प्रा. विकास जांभुळकर, छोटू शेंडे, सुरेश पाटील, मिलिंद मेश्राम तसेच शहरातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.