नागपूर :दानापूर एक्स्प्रेसच्या पँट्री कारमध्ये बेकायदेशीररीत्या मालाची विक्री करणाऱ्या ठेकेदाराची पँट्री कारच्या विक्रेत्यांशी मोठा वाद झाल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकरण इतके चिघळले की दोन्ही गटात हाणामारी झाली. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर आरपीएफने मारहाण करणाऱ्या चार तरुणांना अटक केल्याची माहिती आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या कडक कारवाईनंतरही स्थानक आणि गाड्यांवरील अवैध फेरीवाल्यांची संख्या कमी होत नाही.आता आपला माल विकण्याच्या शर्यतीत हे विक्रेते एकमेकांना मारहाणही करत असल्याचे प्रकार समोर आले आहे. दानापूर सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला असून तेथे बेकायदेशीर विक्रेते आणि पँटी कार कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर काही काळ गोंधळ उडाला.
माहितीनुसार, बेतूल ते नागपूरपर्यंत पाणी, कोल्ड्रिंक्स आणि ताक यांसारख्या पेयांची विक्री करणाऱ्या बेकायदेशीर विक्रेत्यांचा पेंटी कारच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचाऱ्यांनी अवैध विक्रेत्याला पाण्याच्या बाटल्या विकण्यापासून रोखल्याचे सांगितले जात आहे. शिवीगाळ केल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पॅन्ट्री कारच्या व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, त्यांनी काही अवैध विक्रेत्यांना पॅन्ट्री कारमध्येच बसवले.
या दरम्यान ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचली. रेल्वे स्थानकावर थांबताच दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद पेटला. आरपीएफच्या पथकाने तेथे पोहोचून प्रकरण शांत केले. त्यानंतर हल्ला करणाऱ्या चार तरुणांनाही अटक करण्यात आली. मात्र, या घटनेदरम्यान नागपूर रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.