मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालाची सर्वाना उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीची दोन्ही गटांची आजची सुनावणी संपली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत. यासाठी ते दोन्ही गटाची परवानगी घेणार आहेत, तसा प्रस्ताव ते सर्वोच्च न्यायालयात देणार आहेत,असे झाले तर राष्ट्रवादीतील वादावर फेब्रुवारीमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीवेळी नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाली. दोन्ही गटांना बाजू योग्य पद्धतीने मांडायची असेल तर वेळ देणे गरजेचे आहे. यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे मत नार्वेकरांनी व्यक्त केले .
उद्या रविवार, २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण असल्याने पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. २४ जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी, २५ जानेवारीला दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदविली जाणार आहे. २९ आणि ३० जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडतील. ३१ जानेवारीला सुनावणी संपविली जाईल आणि त्यापुढे निकाल देण्यासाठी शिवसेनेप्रमाणेच १० ते १५ दिवसांचा वेळ वाढवून देण्याची मागणी, नार्वेकरांनी केली आहे.










