चंद्रपूर:विकसित भारत संकल्प यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संबोधित केले. यावेळी त्यांनी वरोरा तालुक्यातील खेमजई या गावातील महिलांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांची आस्थेने विचारपूस करीत सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कल्याणकारी सरकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी, भारत पेट्रोलियमचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांचीही उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की,मोदी सरकारने २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेची चावी हाती घेतली तेव्हा भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात १० व्या क्रमांकावर होता. मात्र, आता भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी झेप घेतली आहे. आज जगात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असेल, असे पुरी म्हणाले.