नागपूर : शहरातील कळमना येथे प्रेयसीला दारू पाजून तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर प्रियकराने अत्याचार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात धक्कादायक म्हणजे या कृत्याबाबत आईलाही माहिती होते. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलिसांकडून शोधशोध सुरु आहे.
माहितीनुसार, रोहित चौरे (वय ३०, कळमना) असे आरोपीचे नाव असून, तो हातमजुरीचे काम करतो. तसेच त्याच्यासोबत पीडित अल्पवयीन मुलींची आई देखील काम करायची. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. महिलेला १६ व १४ वर्षांच्या दोन मुली असून, पतीचे निधन झाले आहे. रोहित अनेकदा तिच्या घरी जायचा व तिथेच दारू प्यायचा. जून २०२२ मध्ये त्याने १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला.
आईच्या भरवशावरच घर चालत असल्याने व रोहित तिचा मित्र असल्याने मुलीने त्याबाबत काहीच वाच्यता केली नाही. त्यानंतर त्याने लहान मुलीवरदेखील अत्याचार केले. या प्रकाराची त्या मुलींच्या आईला माहिती होती. मात्र, तिने त्याला विरोध केला नाही. रोजच्या त्रासामुळे मुली कंटाळल्या होत्या. त्यातूनच एका मुलीने घरातून पळ काढला.
४ ऑक्टोबर रोजी महिलेने मुलगी हरविल्याची तक्रार जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. १० ऑक्टोबर रोजी ती मुलगी पोलिसांना सापडली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी आईला ताब्यात घेतले असून प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.