नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी इंडिया आघाडीने आपली ताकद वाढवण्यासाठी नागपूरमध्ये ५ नोव्हेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन केले होते. मात्र आता राज्यात 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान असल्याने तारीख पुढं ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे आघाडीने लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नागपूर शहर निवडले होते. विरोधी आघाडी इंडियाची (I.N.D.I.A.) नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. 4 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुका होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनासभा पुढं ढकलण्याची विनंती केल्यामुळे वरिष्ठांनी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
भाजप सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांनी २८ पक्ष एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली. एनडीएला घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते एकजुटीने काम करत आहेत, विरोधकांची ही एकजूट संसदेच्या अधिवेशनातही दिसून आली. I.N.D.I.A. आघाडीने यापूर्वी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत तीन बैठका घेतल्या आहेत. या आघाडीची शेवटची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली होती.