केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपुरच्या वतिने तहसील कार्यालय, काटोल आणि नबीरा महाविद्यालय, काटोलच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, केंद्र शासनाची सुशासन व गरीब कल्याणाची 9 वर्ष, मेरी माटी मेरा देश, हर घर तिरंगा या विषयांवर आधारीत एक मल्टीमिडीया छायाचित्रप्रदर्शनी नबीरा महाविद्यालय, काटोल येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष निरंजन राऊत, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाशजी चांडक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के. नवीन, उप प्राचार्य मा. सुजाता गांधी, डॉ विकास बारसागडे, डॉ. सुरेश मोटवानी , केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय व पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशिन् राय इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. संजय दुधे यांनी स्वातंत्र्याचे महत्व, देशभक्ती बद्दलची जाणीव, युवकांची देशाच्या विकासातील भूमिका, जागतिक पातळीवर भारताची बदललेली प्रतिमा याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनी मध्ये काटोल येथील महावितरण, एकात्मिक बाल विकास योजना, महिला बाल कल्याण योजना, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिति, ग्रामिण रूग्णालय, आरोग्य विभाग, संजय गांधी निराधार योजना विभागांनी आपले माहितीपर स्टॉल लावून त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली.
या प्रदर्शनी मध्ये भारत सरकारने केलेल्या विकास कामांबाबत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचा संदेश ,स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे भव्य छायाचित्रांचा समावेश आहे. त्याच बरोबर भारताच्या फाळणीचा इतिहास उलगडणारे अशी विविध प्रकारची माहिती सांगणारे हे प्रदर्शन 14 ते 16 ऑगस्ट, 2023 पर्यन्त सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क सुरू राहणार आहे. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत नाटक पथका द्वारे जनजागृति कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिन् राय यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पुनित राऊत यांनी केले तर प्रा. हरीश किनकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ एस.के. नवीन, प्रा.डॉ. पुनित राऊत, प्रा. मुकेश जाधव, प्रा. डॉ. रूईकर, प्रा. हरीश किनकर, प्रा. जयंत कळभे, केंद्रीय संचार ब्यूरोचे तांत्रिक सहायक संजय तिवारी, सहकारी नरेश गच्छकायला, सी.एस.चडुके तसेच पत्र सूचना कार्यालयाचे सहायक अभिषेक अवस्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे.