नागपूर : नागपूरमधील गोधनी रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात आज, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित केले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या अडचणी दूर करणाऱ्या सुविधा वाढवण्याच्या एकत्रित प्रयत्नां अंतर्गत, नागपूर विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व्यापक आधुनिकीकरण आणि पुनर्विकास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. काटोल, नरखेड आणि गोधनी रेल्वे स्थानकांचा कायापालट घडवण्यात, अमृत भारत रेल्वे स्थानक योजना आघाडीवर असेल, तसेच नागपूर मुख्य रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या सुधारणेतही महत्वाची भूमिका बजावेल, असेल असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्विकास प्रकल्पाची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. याप्रसंगी गडकरी बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.
ब्रॉडगेज फास्ट लोकल मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करुन, तो प्रकल्प रेल्वे मंत्रालयाशी संलग्न करण्यासाठी सक्रीय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. हा प्रकल्प नागपूरला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वडसा आणि नरखेड यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडण्यासाठी उपयुक्त आहे आणि नागपूर-वर्धा चौपदरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर त्याचे काम सुरू होणार आहे, असे ते म्हणाले. गोधनी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याकरता आवश्यक सिमेंट काँक्रीट रस्ता, केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर करण्याची घोषणाही, या निमित्ताने नितीन गडकरी यांनी केली.
मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे विभागा अंतर्गत येणाऱ्या, गोधनी, काटोल, नरखेड, पांढुर्णा, मुलताई, आमला, बैतुल, घोडडोंगरी, जुन्नरदेव, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या रेल्वे स्थानकांचा समावेश, अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेत करण्यात आला आहे. हे महत्त्वाकांक्षी काम, लवकरात लवकर यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी, 372 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात, मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने देखील उपस्थित होते.