नागपूर : महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातील सखल भागातील रहिवाश्यांना गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. मुसळधार पावसाने नागपूरच्या उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागांसह विविध भागांना प्रभावित केले, परिणामी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. घटनेने नागपूर महापालिकेच्या (NMC) मान्सूनच्या तयारीचे पितळ उघडे पडले आहे.
महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या G20 बैठकीसाठी नागरी संस्थेने शहराच्या सुशोभिकरणासाठी करदात्यांच्या पैशाचा दुरुपयोग करण्यात आला. मात्र आता शहरात अतिवृष्टीमुळे अत्यावश्यक सेवांची कमतरता समोर आली. अवाजवी खर्चामुळे महापालिकेच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील पायाभूत सुविधा आणि ड्रेनेज व्यवस्था मजबूत करण्यासाठी या निधीचा अधिक चांगला वापर करता आला असता, असा तर्क अनेकांनी व्यक्त केला आहे.
नागपुरात महापालिकेकडून पावसाळ्याचे पूर्व नियोजन कारण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी नागपुरात पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करुन साफसफाई केली जाते. मात्र आज झालेल्या पावसामुळे मनपाचं पितळ उघडं झालं आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण ? असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. माजी महापौर, माजी महापालिकेचे आयुक्त आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे या स्थितीबाबत अनेक जण उत्तरांची मागणी करत आहेत.