नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर येत आहे. सायबर पोलीस ठाण्यात जवळपास दररोजच याबाबतच्या तक्रारी दाखल होत आहेत. यासंदर्भातील नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे.
सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीची ८.७७ लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. भावेश मोरेश्वर उके (३७) रा. वैभवनगर, दिघोरी असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.
माहितीनुसार, १४ जून रोजी भावेशच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. हा मॅसेज अनन्या मिश्रा नावाच्या तरुणीचा होता. त्यात यूट्यूबवर व्हिडिओ लाईक आणि सब्सक्राइब केल्यास पैसे मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. भावेशकडून होकार मिळताच त्याला ‘टास्क’ देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर त्याच्या खात्यात पैसेही जमा झाले.
भावेशचा विश्वास संपादन करून ‘प्रिमियम टास्क’ पूर्ण केल्यास अधिक लाभ मिळण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्याच्याकडून ८.७७ लाख रुपये घेण्यात आले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे काळातच भावेशने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.