छत्रपती संभाजीनगर: एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल अशी चर्चा सुरु झालेली असताना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र वर्ष उलटले तरी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नाही. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. राज्यात पुढील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली. आज दुपारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो या संदर्भातच अनेक बैठक असतात त्यामुळे केंद्र जावे लागते असे फडणवीस म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे विधान फडणवीस यांनी केले.
दरम्यान वर्षभरात अनेकवेळा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोन्ही पक्षातील नेत्यांनी तर तारखा जाहीर केल्या. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही यावरून विरोधकांनीही शिंदे आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढले.