नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरकडून स्वतःच्या नर्सिंग होममध्ये जन्मलेल्या बाळाची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र ज्या नर्सिंग होममध्ये महिलेने बाळाला जन्म दिला त्याठिकाणच्या डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली.डॉ. आशिक बराडे (४२) रा. कोलते लेआऊट, मानकापूर असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधातून महिलेने डॉ. बराडेंच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला. मात्र बलात्काराचा आरोपी व डॉक्टर महिलेला बाळाची माहिती देत नव्हते. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून हे बाळ इतरांचे असल्याचा बनाव रचला. मात्र आरोपी डॉक्टरचे पितळ उघड झाले. पोलिसांकडून डॉक्टरांची कसून चौकशी करण्यात येत आहे.