नागपूर : वाठोड्यात एका २२ वर्षीय युवतीने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियंका नंदराव सराटे (रा.संताजीनगर, वाठोडा) असे मृत युवतीचे नाव आहे. ‘माझी मैत्रिण स्वर्गात माझी वाट बघत आहे. ती मला नेहमी बोलावते. स्वप्नात येऊन सोबत नेण्याचा प्रयत्न करते. ती स्वर्गात एकटीच आहे, त्यामुळे तिला साथ देण्यासाठी मला जायचे आहे’ असे प्रियंका हे ठोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही उच्चशिक्षित असून गेल्या वर्षभरापासून ‘चाय-चौपाटी’ येथे नोकरी करीत होती. कामाच्या ठिकाणी तिची सोनाली नावाच्या मुलीशी मैत्री झाली. कालांतराने ही मैत्री फार घट्ट झाली. सोनालीने गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोणत्यातरी कारणावरून आत्महत्या केली. सोनालीच्या मृत्यूचा धक्का प्रियंकाला बसला होता. त्यानंतर ती नैराश्यात गेली. तिच्या स्वप्नात सोनाली येत होती.
‘ती स्वर्गात येण्यासाठी हट्ट करीत आहे’, असे प्रियंका वारंवार आईला सांगत होती. कुटुंबिय तिची समजूत घालत होते. ती कामावर गेल्यानंतरही मैत्रिणीसाठी रडत होती. मैत्रिण स्वर्गात एकटी असल्याचा भास झाल्याने प्रियंकाने घराशेजारी असलेल्या बर्फाच्या कारखान्यातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी काम करणाऱ्या मजुराने पाण्यात प्रियंकाचा मृतदेह पहिला. या घटनेची त्याने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासा सुरु केला आहे.