नागपूर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
भारत राष्ट्र समितीची मुळे महाराष्ट्रात रुजावी याकरिता दिनांक १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, संयोजक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला व अभ्यासपूर्ण भाषण करत श्रोत्यांचे मन जिंकले.
सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पावन भूमीला वंदन करीत त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे ? पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. निवडणुका जिंकणे हेच जणू भारताचे लक्ष्य झाले आहे. परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा विजय व्हायला हवा. ही शरमेची गोष्ट आहे की, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन देखील अजूनही लोकांना मुबलक पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत ही अत्यंत शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे, इतक्या नद्या आणि सुपीक प्रदेश असूनही असे का व्हावे हे दुखःद आहे. बीआरएस भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे. परिवर्तित भारतच आजच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. दलीत व आदिवासी समाजाची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत सुदृढ व सशक्त समाजाची निर्मिती होणार नाही. आपल्या सर्वांना जागृत होण्याची गरज आहे, भारतात दरवर्षी १,४०,००० टीएमसी पाऊस पडतो. बाष्पीभवन आणि भूमीत शोषल्या नंतर देखील जवळपास ६०,००० टीएमसी पाणी आपल्या नद्यांमधून वाहते. तरी आपल्या जनतेला पाणी मिळत नाही. आपण जर या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तरी देखील १५-२० हजार टीएमसी पाणी उरेल.
वीजेची देखील तीच समस्या आहे. ३६१ बिलियन टन कोळसा साठा भारतात आढळून आला आहे. याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास १५० वर्षे पर्यंतभारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. पण तरीही आज आपल्याला २४ तास वीज मिळत नाही, याचे कारण काय ?
तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना २४ तास मोफत पाणी व वीज पुरवतो. आम्ही तहसील मध्ये तलाठी व्यवस्था समाप्त केली आणि सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सर्व नागरिकांना मिळण्याची व्यवस्था केली आहे. कारण आम्ही संपूर्ण राज्याला ५००० एकराच्या क्लस्टरमध्ये आणले व य क्षेत्रावर एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यामुळे कोणतीही योजना किंवा मदत संबंधित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते. धान उत्पादनामध्ये देखील तेलंगणा राज्याने देशात विक्रमी उत्पन्न घेतले. महाराष्ट्रात जर ही पद्धती जर लागू झाली तर नेत्यांचे दिवाळे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत व माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना नांदेड येथे भेटलो असता ते म्हणाले की तुमचे इथे काय काम ? तर मी त्यांना म्हणालो तुम्ही तेलंगणा मॉडेल याच अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये लागू करा मी मध्य प्रदेश मध्ये जातो. आपले खाद्यान्न संपूर्ण जगात जायला हवे, शेतकऱ्यांना त्याचे उत्तम मूल्य मिळायला हवे पण आपण मात्र पाश्चत्यांचे पिझा बर्गर खाण्यात धन्यता मानतो.
आतापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख लोक आमच्या कमिटीमध्ये आलेले आहेत आणि यापुढेही वेगाने अनेक लोक जुळतील. भारताला बदल हवा आहे, योग्य दिशेने आणि योग्य तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे शक्य आहे. भारत परिवर्तनासाठी आमचे प्रयत्न असेच सुरू राहतील आपणही वरील विषयांवर आपसांत बुद्धिजीवी चर्चा करावी माझ्या सर्व वक्तव्यांची चाचपणी करावी व मग विश्वासाने परिवर्तनाच्या या अभियानात सामील व्हावे.
तत्पूर्वी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश समिती अध्यक्ष माणिकराव कदम यांनी स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले की, ३४ % आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण तेलंगणा मध्ये हा आकडा खूप कमी आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर केसीआर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत अण्णा यांनी के. चंद्रशेखर राव यांचं विदर्भातील हे पाऊल विदर्भातील बळीराजाच्या उद्धारासाठी फार मोठे पाऊल असेल. आता भारतात आणि महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भाकीत केले.
तर माजी आमदार चरणसिंग वाघमारे आपल्या मनोगतात म्हणाले की, तेलंगणा विकासाचे मॉडेल मुळातून समजून घेतल्यावर ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला. केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात अनेक उपक्रम राबविले आणि त्यांच्या प्राथमिक गरजा योजनांची तातडीने अंमलबजावणी करून पूर्ण केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात आता गुलाबी वादळ येऊ द्या, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.