नागपूर : चंदननगर येथील आनंद पब्लिक स्कूलच्या खोलीत रविवारी दोन मित्रांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे खोलीत आग लागल्याने श्वास गुदमरल्याने त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमन मनोज तिवारी (18) आणि आकाश अनिल राजक (23) अशी मृतांची नावे आहेत, दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील सिवनी येथील रहिवाशी असून ते दोघेही चांगले मित्र होते. या दोघांच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 महामारीच्या काळात शाळा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही शाळा सूरज कडू आणि उकेक्षा लांडगे यांना नृत्य प्रशिक्षणासाठी भाड्याने देण्यात आली.शाळेच्या पहिल्या मजल्यावरची एक खोली लांडगे यांना भाड्याने दिली होती, तिथे तिने काही साहित्य ठेवले होते. अमन येथे इतर कामगारांसह राहत असे. शनिवारी रात्री आकाश त्याला भेटायला आला होता. ज्या खोलीत ही घटना घडली त्या खोलीत रेफ्रिजरेटर, सोफा, बेड आणि इतर साहित्य होते. दोघेही शनिवारी रात्री खोलीत जेवण करून झोपले.
मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे रेफ्रिजरेटरला आग लागली. शेजारील सोफाही जळून राख झाला. अमन आणि आकाश झोपेत असताना त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन मजूर अमनला बोलावण्यासाठी शाळेत आले असता ही घटना उघडकीस आली.त्यांना खोलीचा दरवाजा बंद दिसला आणि त्यांनी त्याला बाहेर बोलावले, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सुरक्षा कर्मचारी मनोजकुमार शाहू यांनीही अमनला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ते दोघेही शाळेतून निघून दुपारी दोनच्या सुमारास परतले, पण तरीही अमनकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हाच खोलीत दोन्ही तरुण मृतावस्थेत आढळले. हे पाहून त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. या घटनेची इमामबाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त पुंडलिक भाटकर, इमामवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
पंचनामा केल्यानंतर अमन आणि आकाशचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.