नागपूर : राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. नागपूर विभागात पहिल्या टप्प्यात एकूण ४२० शेतकऱ्यांपैकी २१३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत ४२५ लाख रुपयांचा निधी शेतकरी आणि त्यांच्या कुटूंबाना वितरित करण्यात आल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शेती करताना झालेल्या अपघातामुळे शेतकऱ्यांना मोठी दुखापत झालेली असते. हे लक्षात घेता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय अनुदान देण्याकरिता वर्षभराच्या कालावधीकरिता विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. हा विमा कालावधी संपुष्टात आल्यावर दुसऱ्या कंपनीची नियुक्ती होईपर्यंतचा कालावधी हा खंडीत करण्यात येतो. सरकारकडून शेतकऱ्यांचा विमा काढला जातो. त्यानंतर दुर्घटना झाल्यानंतर लाभ मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत सातबारा, वयाचा पुरावा, शिधापत्रिका, अपंगत्वाचा दाखला, एफआयआर, घटनास्थळाचा पंचनामा, पोलिस पाटील माहिती आदी कागदपत्रे जोडणे बंधनकारक असते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून फक्त सातबारावर नाव असलेल्यांनाच नाही तर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याचा फायदा होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.










