नागपूर : नायर सन्सचे 47 वर्षीय कर्मचारी योगेश चौधरी यांच्याकडून बंदुकीच्या धाकावर 8.50 लाख रुपयांची रोकड शनिवारी सायंकाळी उशिरा अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौधरी आपल्या कारमधून परिसरातून जात असताना लेडीज क्लब लॉनजवळ ही घटना घडली.
डीसीपी झोन राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांनी इतवारी येथून रोख रक्कम गोळा केली होती आणि ती जमा करण्यासाठी ते राम नगर येथील कार्यालयात जात होते. चौधरी आपल्या कारमध्ये लेडीज क्लब लॉनजवळून जात असताना मागून दोन तरुणांनी येऊन त्यांची कार अडवली. त्यांनी दगडाने कारची विंडशील्ड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न फसल्याने त्यांनी चौधरी आणि त्यांच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवला. लागलीच चालकाने कार थांबवून घटनास्थळावरून पळ काढला. चौधरी यांनीही रोकड असलेली बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी चौधरी यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली आणि त्याठिकाणाहून पळ काढला, डीसीपी मदने म्हणाले. या घटनेसंदर्भात चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिली.
अंबाझरी पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. अंबाझरी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. फुटेजच्या आधारे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.सिव्हिल लाईन्स दरोडा प्रकरणाच्या तपासात तीन जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून, त्यांनी दरोडा टाकण्यासाठी दोन मोटारसायकलींचा वापर केला होता. 2010 मध्ये इमामबाडा परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती, तर दुसऱ्या दुचाकीसाठी बोगस क्रमांक वापरण्यात आला होता.आरोपींनी दरोड्याची अगोदरच योजना आखली होती आणि त्यांना चौधरीच्या हालचालींची माहिती असल्याचे समोर आले आहे.