नागपूर : प्रमोद पतिराम ढोंगे याला स्वतःच्या आईच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.फिर्यादीनुसार, प्रमोद ढोंगे (वय 30, रा. अंबाला, ता. रामटेक) याला दारूचे व्यसन होते. तो आई कमलाबाई ढोंगे यांच्याकडे राहायचा . वडील पतिराम हे गेल्या १५ वर्षांपासून बेपत्ता होते. नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना समजले. त्याचा मोठा भाऊ नागपूरच्या एका हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग विभागात काम करत होता. प्रमोद अनेकदा दारूच्या नशेत आई कमलाबाईला पैश्यासाठी त्रास देत होता.
21 फेब्रुवारी 2019 रोजी आधीच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रमोदने कमलाबाईंकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तिने नकार दिल्याने त्याने तिच्याशी भांडण केले. जोरदार बाचाबाची झाल्यानंतर त्याने कुऱ्हाडी उचलून कमलाबाई यांच्यावर वार केल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अंबाला येथील रहिवासी सचिन लक्ष्मीकांत संगीतराय (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी त्याच दिवशी प्रमोदला भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०२ आणि २०१ नुसार अटक केली.
पीएसआय राजू मृत्युपोड यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान, न्यायालयाने तब्बल 13 साक्षीदार तपासले. प्रमोदवर भादंवि कलम ३०२ अन्वये आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला ५००० रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्यातर्फे अतिरिक्त सरकारी वकील क्रांती नेवारे यांनी काम पाहिले.