नागूपर: “हिंदुत्वाच्या भाकड कथा आम्हाला सांगू नका, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा नागपूरमध्ये होत आहे. या सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.
वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
दर वेळेला माझ्यावर आरोप केला जातो, मी काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं. का? काँग्रेसमध्ये कोणी हिंदु नाही का? मग संघाला देखील मला विचारायचय, नेमक तुमच आणि भाजपच चाललंय काय? यांच हिंदुत्व हे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. ते एवढ्यासाठी की संभाजीनगरला अशीच अलोट गर्दी झाली, तिकडे हे गोमुत्रधारी गेले, गोमुत्र शिंपडायला. अरे थोड प्राशन करा, थोडी अक्कल येईल. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपने जाहीर करावं त्यांच हिंदुत्व म्हणजे काय?
एका बाजुला हनुमान चालीसा म्हणायची, दुसर्या बाजुला मशीदीत जाऊन हे कव्वाली ऐकणार, उत्तरप्रदेशात मदरसात जाऊन उर्दुत मन की बात करणार. हे यांच हिंदुत्व. या हिंदुत्वाच्या भाकडकथा आम्हांला सांगु नका, या देशासाठी मातीसाठी जो जीव द्यायला तयार तो आपला माननार आमचं हिंदुत्व.
एका महिलेला पाडुन तिच्या पोटात लाथा घालता, हे तुमच हिंदुत्व? हे संघाला मान्य आहे का? तिची तक्रार पोलीस घ्यायला तयार नाहीत. हॉस्पिटलवर दबाव टाकत होते, तिला सोडा, बाहेर आल्यावर अटक करायची होती. याला फडतूस नाही तर काय म्हणायचे? हा कारभार संघाला मान्य आहे का? विश्वगुरु असलेल्या मोदीजींना मान्य आहे का? गृहमंत्र्यांना मान्य आहे का? अन्याय करणार्या, गुलाम बनवणार्यांना आता त्या खुर्चीवर आम्हीं बसु देणार नाही, ही शपथ तुम्हीं घेतली पाहिजे.
घरात बसुन कारभार करत असताना देखील देशात पहिल्या पाचमध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा क्रमांक होता! नुसतच वणवण फिरलात म्हणजे काम केलं अस होत नाही. शेतकरी टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, जीव पिळवटुन टाकणारा टाहो फोडत असताना मुख्यमंत्री जाऊन आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. जेंव्हा आपलं सरकार होत तेंव्हा तातडीने मदत पोचवली होती.