नागपूर : दोन वर्षांपासून थकीत असलेल्या वीज बिलाची मागणी करणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञास वीज ग्राहकाच्या तरुण मुलाने मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत सोमवारी २० फेब्रुवारीला घडली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी साहिल खान समद खान विरुद्ध भादंवि ३५३,५०४,५०६ कलमानवये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.
महावितरणच्या नंदनवन उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सूतगिरणी शाखा येथे विजय वामनराव बर्वे हे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सक्करदरा परिसरातील यासिन प्लॉट येथील प्लॉट न. ०५ मध्ये राहणाऱ्या समद रेहमन खान या वीज ग्राहकाकडे २०२१ पासून १७ हजार रुपयांची वीज बिलाची थकबाकी आहे.
सोमवारी २० फेब्रुवारीला वीज बिलाची वसुली करीत असताना ही वीज बिलाची थकबाकी भरावी असे तंत्रज्ञ विजय बर्वे यांनी ग्राहकास सांगितले.तसेच वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असेही सांगितले.मात्र त्याचा राग धरून तेथे उपस्थित असलेल्या वीज ग्राहकाचा मुलगा साहिल खान समद खानने तंत्रज्ञ विजय बर्वे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली व धमकी दिली.
या प्रकरणी तंत्रज्ञ विजय बर्वे यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी साहिल खान समद खान विरुद्ध भादंवि ३५३,५०४,५०६ कलमानवये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.