Published On : Fri, Nov 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

राहुल गांधी यांना चांगल्या डॉक्टरची गरज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्वातंत्रवीर सावरकर यांना स्थानबद्ध करण्यात आलेल्या रत्नागिरी येथील कारागृहातील कोठडीला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत बोलत होते.

राहुल गांधी यांनी येथे येऊन कधी बघितले का, असा सवाल करीत मा. बावनकुळे यांनी राहुल गांधी यांची स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का, असाही टोला लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर राहुल गांधी यांना राज्यातून हाकलून लावले असते, परंतु त्यांचे नातू गळाभेट घेत आहेत.

राहुल गांधी यांनी ही कोठडी बघावी, साखळदंड, बेड्या बघाव्या. सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके बघावी. आज मी हे सारे बघितले, भावना अनावर झाल्या. या भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी राहुल गांधी यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ…उपस्थित होते.