Published On : Sat, Nov 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव – 2022 2 ते 11 डिसेंबर दरम्‍यान आयोजन

Advertisement

नागपूर: डिसेंबरच्‍या हुडहुडी भरवणा-या थंडीत नागपूरकरांना मनोरंजनाची ऊब देण्‍यासाठी यंदा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे 2 ते 11 डिसेंबर 2022 दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले आहे. गायन, वादन, नृत्‍य, नाटक, काव्‍य अशा अनेकविध कलांचा संगम असलेल्‍या या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात स्‍थानिक, राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या कलाकारांचा सहभाग राहणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला हा खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सव आता केवळ मध्‍य भारतापुरताचा मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण देशात चर्चिला जात आहे. अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे कलाकार खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात आपली कला सादर करण्‍यासाठी उत्‍सूक आहेत. 2017 साली सुरू झालेल्‍या या खासदार सांस्‍कृतिक महोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर उभारण्‍यात आलेल्‍या भव्‍य मंचावर कार्यक्रम सादर होतील.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

2 डिसेंबर रोजी होणार उद्घाटन
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन शुक्रवार, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता होईल. यात स्‍वातंत्र्यांच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षान‍िम‍ित्‍त तयार स्‍थानिक कलावंतांनी तयार केलेला ‘वंदेमातरम्’ हा बहुरंगी कार्यक्रम सादर होणार आहे. 1000 कलाकारांचा समावेश असलेल्‍या या कार्यक्रमात नृत्‍य, नाट्य, गायन, वादन आदींचा समावेश राहील. ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर त्‍याकरिता 20 हजार चौ.फूट आकाराचा 11 फूट उंचीचा 4 स्‍तरीय मंच उभारला जात आहे.

दररोज स्‍थानिक कलावंतांचे कार्यक्रम
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीच्‍यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्‍थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्‍याची संधी उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. मुख्‍य कार्यक्रमाच्‍या अर्धा तास आधी स्‍थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम होतील. त्‍यात संस्‍कृत सखी सभा, नागपूरच्‍यावतीने 5500 महिलांचा सहभाग असलेला भव्‍य गीतापठन महायज्ञ, बालकला अकादमीच्‍यावतीने आयोजित बालकलाकारांचा कार्यक्रम, ट्रान्‍सजेंडरचा नृत्‍याचा कार्यक्रम यांचा समावेश आहे.

लाईव्‍ह कॉन्‍सर्ट व महानाट्य
महोत्‍सवाच्‍या दुस-या दिवशी म्‍हणजे 3 डिसेंबरला सुप्रसिद्ध गझल गायक व संगीतकार पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ होणार असून 4 तारखेला सर्वश्रेष्‍ठ संगीतकाराचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार पटकावणारे व ‘देव डी’ चित्रपटासाठी सर्वाधिक फिल्‍मफेअर पुरस्‍कार पटकावणारे गीतकार, संगीतकार, गायक अम‍ित त्रिवेदी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ होईल. 5 तारखेला प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी ‘चाणक्‍य’ चा प्रयोग सादर करतील. 6 तारखेला नागपूरच्‍या कलाकारांचे ‘तथागत’ हे भगवान बुद्ध यांच्‍या जीवनचरित्रावर आधारित महानाट्य तर 7 तारखेला मराठा साम्राज्‍यातील सुप्रसिद्ध राणी, दानशूर, कर्तृत्‍ववान, धर्मपरायण राज्‍यकर्ती अहिल्‍याबाई होळकरयांच्‍या जीवनचरित्रावर आधारित ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ हे महानाट्य प्रस्‍तुत केले जाणार आहे. 8 तारखेला “गलियां”, “तेरे संग यारा”, “तेरी मिट्टी” या अतिशय लोकप्रिय गीतांचे गीतकार, ‘कौन बनेगा करोडपती’चे पटकथा लेखक मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्‍बत’ हा कार्यक्रम होईल. 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा यांचा हास्‍यव्‍यंग कवितांचा कार्यक्रम होणार आहे. 10 तारखेला सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्‍णमूर्ती यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ होईल. 11 तारखेला खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा समारोप ‘मस्‍सकली’, ‘साड्डा हक’ यासारख्‍या लोकप्रिय गीतांचे गायक मोहित चौहाण यांच्‍या लाईव्‍ह कॉन्‍सर्टने होणार आहे.

नागपूर-विदर्भाची व मध्‍य भारताची शान असलेल्‍या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांनी केले आहे.

खासदार सांस्कृतिक महोत्सव वेळापत्रक
शुक्रवार, २ डिसेंबर : उद्घाटन व ‘वंदेमातरम्’ हा स्‍थानिक कलाकारांचा कार्यक्रम
शनिवार, 3 डिसेंबर: पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
रविवार, 4 डिसेंबर : अम‍ित त्रिवेदी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
सोमवार, 5 डिसेंबर : अभिनेते मनोज जोशी यांचा ‘चाणक्‍य’ हा नाट्यप्रयोग
मंगळवार, ६ डिसेंबर : ‘तथागत’ हे भगवान बुद्ध यांच्‍या जीवनचरित्रावर आधारित महानाट्य
बुधवार, ७ डिसेंबर : ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्य
गुरुवार, ८ डिसेंबर : मनोज मुंतशिर यांचा ‘मॉं, माटी और मोहब्‍बत’ हा कार्यक्रम.
शुक्रवार, ९ डिसेंबर : प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा यांचा हास्‍यव्‍यंग कवितांचा कार्यक्रम
शनिवार, १० डिसेंबर : सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्‍णमूर्ती यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
रविवार, ११ डिसेंबर : गायक मोहित चौहाण यांची ‘लाईव्‍ह कॉन्‍सर्ट’ व समारोप

Advertisement
Advertisement
Advertisement