नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे आतापर्यंत नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये २ लाख विद्यार्थ्यांना तिंरगा वाटप करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील १३० महानगरपालिकेच्या शाळेतील १५ हजार विद्यार्थांचा यात समावेश आहे. अभियानासाठी, प्रशासनातर्फे २३ केंद्रीय शाळा पथकाद्वारे तिरंगा वाटप केला जात आहे. या अभियानाद्वारे नागपूर शहरातील सुमारे ६ लाख घरांवर तिरंगा फडकाविण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, यासाठी केंद्रीय शाळा पथकाद्वारे शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप केले जात आहे. नागपूर शहरातील मनपा शाळा, खाजगी शाळांचे ४ लाख विद्यार्थी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील होणार आहेत. तसेच नागरिकांना मनपाद्वारे स्वस्त दरात झेंडा उपलब्ध करून दिला जात आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाअंर्गंत शहरातील प्रमुख ७५ चौकात, रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सुरू असून, यासाठी शाळांनी अभियानात सहभागी व्हावे असे, आवाहन नागपूर महानरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. मनपाच्या या पुढाकाराला साथ देत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याच्या गौरवशाली ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील व्हावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
स्वस्त दरात तिरंगा
शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत झेंड्याचे वितरण केले जात आहे. मनपा शाळातील विद्यार्थ्यांना मनपा अधिकारी आणि कर्मचारी निधी गोळा करून झेंडे वाटप करीत आहेत. तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र १५ रुपयात झेंडे उपलब्ध केले जात आहेत. नागपुरात ७०० च्या वर शाळा आहेत आणि तेथील ४ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झेंडे उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे. याव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांपर्यंत सुद्धा स्वस्त दरात झेंडे पुरवण्यात येत आहेत.
मनपा मुख्यालयात झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून येथे २६X४२ आकाराचा तिरंगा २६ रुपयांना तर २०X३० आकाराचा तिरंगा १४ रूपयांना उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक झोन कार्यालयामधून राष्ट्रीय ध्वज नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत आहे. नागरिकांनी देश गौरवाच्या अभियानात शामिल व्हा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.