अमरावती/अकोला: अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग-६ वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवस, रस्त्यावर अखंड बिटुमिनस काँक्रिट पेव्हिंगचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहिल्या दिवशी, 3 जून रोजी,सकाळी सात वाजून 27 मिनिटांनी प्रारंभ झाल्यानंतर, सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ९ मीटर रुंदीच्या रोडवर, 4000 रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचा टप्पा गाठला. म्हणजेच दोन्ही लेन मिळून 8 किलोमीटरचा टप्पा पार झालेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रखरखत्या उन्हात, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक व चमू न थकता, न दमता, हा विक्रम गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम करीत आहेत.
अमरावती-अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा असतानादेखील, महामार्ग बांधकामाचे आव्हान स्वीकारण्यात आले. या रखरखत्या उन्हात, 41 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असतानाही, सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी एकजूट होऊन विक्रम पूर्ण करण्यासाठी कार्यमग्न आहेत. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीदेखील सहभागी झालेले आहेत. या सर्वांसाठी दुपारचे भोजन त्यांच्या त्यांच्या कार्याच्या ठिकाणी पोहचविण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या विक्रमी ऐतिहासिक कार्याला प्रारंभ झाला असून, महामार्गावरील वाहतूकदेखील कुठेही खोळंबू न देता, अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेले आहे.
मेन्टेनन्स विभागातील कर्मचारी, अरविंद गौतम म्हणाले, रोजगाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलो. 2002 पासून मी राजपथ इन्फ्राकॉन कंपनीत कार्यरत आहे. तेव्हापासून मराठी मातीत एकरूप झालो आहे. ह्या उपक्रमाची माहिती मिळाल्यापासून, आमच्यामध्ये एक नवीन जोश निर्माण झाला होता. आज सकाळी 5 वाजतापासून कामावर आहोत. मेंटेनंस विभागात कार्यरत असल्याने मोठी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया येथील कर्मचारी अरविंद गौतम यांनी दिली. तर गौरव गोरख यांनी सांगितले की, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी नेहमीच उच्च संकल्प ठेवून कार्य केले आहे. मागील वेळी, सातारा येथेही अशाच प्रकारे विक्रमी रस्ता बांधकाम झालेले आहे. त्यावेळी देखील, आम्ही निष्ठेने काम केले. आज जागतिक विक्रम प्रस्थापित होत असताना, पुन्हा आनंद होत आहे. हे यश आम्ही नक्कीच गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार नवनीत कौर राणा यांची सदिच्छा भेट
अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या चारपदरी रस्ता बांधकामाच्या जागतिक विक्रमी कार्याला प्रारंभ झाल्यानंतर,अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर-राणा यांनी आज 3 जून रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज पथ इंफ्राक्रान चे व्यवस्थापकीय संचालक,जगदीश कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, जागतिक विक्रमी महामार्गाचे बांधकाम अमरावती जिल्ह्यात होत असल्याने,अधिक आनंद आहे. या कार्यामुळे अमरावतीचा गौरव वाढेल. यावेळी त्यांनी या कार्यासाठी सर्व कामगार व अधिकारी-कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.