नाईकवाडी बांगलादेश वासियांना मोठा दिलासा
नागपूर: नाईकवाडी बांगलादेश येथे राहणार्या सुमारे 4 हजार कुटुंबांना ते सध्या राहात असलेली जमीन स्वत:च्या मालकीची म्हणून मिळणार आहे. या जमिनीवर सुमारे 4 हजार कुटुंबे (22 हजार लोकसंख्या) झोपडीवजा घरांमध्ये राहात आहेत. ना. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या जमिनीची रजिस्ट्री येथे राहाणार्या कुटुंबांच्या नावे करून देण्यात येणार आहे. या जमिनीची रजिस्ट्री करताना संबंधित कुटुंबांना राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कात 80 टक्के सवलत मंजूर करण्यात आली आहे.
सन 1972 पासून बांगला देश ही वस्ती तेथे वसली आहे. ही जमीन नगरनाईक काळे (नागनाथ बळवंत काळे) यांच्या मालकीची आहे. अतिक़्रमणामुळे या जमिनीवर झोपड्या-घरे बनली आहेत. मध्यंतरी शासनाने ही जमिनी नागरी कमाल जमीन धारणा कायद्यानुसार ताब्यात घेतली होती. दरम्यान येथील रहिवाशांनी ना. गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सर्व स्थिती कथन केली होती. ना. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे ही जमीन नागरी कमाल जमीन धारणा कायद्याच्या कक्षेतून बाहेर पडली. जमीन या कायद्याच्या बाहेर निघण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव टी.सी. बेंजामिन यांचे सन 2010च्या पत्राचा आधार घेण्यात आला.
या सर्व रहिवाशांना त्याच जमिनीवर मालकी हक्काचे घर देण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत जमिनीचे मालक काळे यांना 325 रुपये चौ. फुट याप्रमाणे रक्कम प्रत्येक कुटुंबाने द्यावी असे ठरले. येथे राहणार्या गरीब कुटुंबांना मुद्रांक शुल्काची रक्कम भरणे शक्य नव्हते. म्हणून राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्काच्या रकमेत सवलत देण्याची विनंती ना. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार शासनाने मुद्रांक शुल्कात 80 टक्के सवलत जाहीर केली. यानंतर या जागेचा नकाशा मंजूर करण्यात आला, आखीव पत्रिका तयार झाली, 7/12 वर संबंधित कुटुंबाचे नाव टाकण्यात आले.
दरम्यान आज रेडिरेकनरचे दर 1545 रुपये चौ. फुटाचे येत असल्यामुळे नगरनाईक काळे यांना आयकर लागणार होता. म्हणून काळे हे रजिस्ट्री करण्यास तयार नव्हते. यावर ना. गडकरी यांनी आयकर विभागाची दिल्ली येथे बैठक बोलावली. या बैठकीला अर्थराज्यमंत्री भागवत कराड होते. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याशी चर्चा झाली. काळे यांना 325 रुपये चौ. फुटाप्रमाणेच आयकर लागेल, असा निर्णय झाला. आता या सर्व कुटुंबांना त्यांच्या वापरात असलेल्या जागेची रजिस्ट्री करून देण्यात येणार आहे.
ना. गडकरी यांनी मध्यस्थी केल्यामुळे सुमारे चार हजार कुटुंबियांना आपल्या मालकी हक्काची जमीन मिळणार आहे. या कामात दीपक देवघरे यांनी 4 वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. झोपडपट्टीधारकासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न केले. देवधर हे यवतमाळ अर्बन बँकेत नोकरी करीत होते. ही नोकरी सोडून त्यांनी हे समाजकार्य केले हे येथे उल्लेखनीय.