नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार श्री चिन्मय गोतमारे यांनी सोमवारी (ता.१८) सकाळी स्वीकारला. त्यानंतर श्री चिन्मय गोतमारे यांनी मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. श्रीमती भूवनेश्वरी एस. यांची बदली वनामती येथे संचालक पदावर करण्यात आली होती आणि त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता महाराष्ट्र शासनाने भुवनेश्वरी एस. यांच्या जागी श्री चिन्मय गोतमारे यांची नियुक्ती केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका येथील ब्राह्मणी गावात जन्मलेले श्री गोतमारे यांनी आपले स्नातक शिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालय, नागपूर येथून पूर्ण केलेले आहे. भारतीय प्रशासनिक सेवेत त्यांची निवड २००९ मध्ये आसाम आणि मेघालय कॅडर मध्ये झाली. मेघालय येथे त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. मेघालय मध्ये शिक्षण, नियोजन, सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाचे सचिव पदावर ते कार्यरत होते. सन २०२१ मध्ये त्यांची बदली महाराष्ट्रात यशदा मध्ये उपमहासंचालक पदावर करण्यात आली. आता त्यांनी सोमवारी नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधीकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी श्री चिन्मय गोतमारे यांचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले. याप्रसंगी कंपनी सचिव श्रीमती भानुप्रिया ठाकूर, राजेश दुफारे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, अधि. मनजीत नेवारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनीष सोनी, मोईन हसन, अहिरकर, परिमल इनामदार आदी उपस्थित होते.