मनपा प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी : अग्निशमन सेवा दिन साजरा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची लोकांचा जीव वाचविण्याची सेवा अग्निशमन व आणीबाणि विभागाद्वारे देण्यात येते. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यास मनपा कटिबद्ध असून त्यादृष्टीने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले.
अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता. १४) मनपा मुख्यालयातील हिरवळीवर अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रवींद्र भेलावे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त व प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्यासह मान्यवरांनी अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणारे शहिद गुलाबराव कावळे, शहिद प्रभू कुहिकर व शहिद रमेश ठाकरे या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अग्निशमन जवानांद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्वीकारली.
अग्निशमन कार्य हे अतिशय जलद गतीने केले जाणारे कार्य आहे. स्वत:चा जीव जोखमीत घालून इतरांचा जीव वाचविण्याचे कार्य करताना जवानांची सुरक्षा राखली जावी यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीनेच मनपाच्या नुकत्याच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी अग्निशमन विभागासाठी देण्याचे आल्याचे मनपा आयुक्त व प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगतिले. सुरक्षेच्या कार्यामध्ये असलेली जबाबदारी आणि जोखीम आपण स्वत: अनुभवली असल्याचेही ते म्हणाले. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा भार लक्षात घेता अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची गरज लक्षात घेउन १०० पदभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला असून येणा-या काळात विभागाची क्षमता आणि वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतरांच्या जीवाची सुरक्षा हातात असल्याने अग्निशमन जवानांनी इतरांच्या तुलनेत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणे आवश्यक आहे. जवानांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देउन राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अग्निशमन स्पर्धांमध्ये आपल्या कार्याची छाप सोडावी, असेही ते म्हणाले. अग्निशमन जनजागृतीसाठी जास्तीत जास्त जनजागृती अभियान राबविण्याचेही त्यांनी सूचित केले. मनपाचे अग्निशमन विभागाची सक्षमता सर उद्दिष्टाला प्राधान्य असून विभागाने त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने कार्य करण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांनी अग्निशमन सेवा सप्ताह आणि अग्निशमन सेवा दिनाची पार्श्वभूमी विषद केली. मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे करण्यात आलेल्या कार्याचीही त्यांनी माहिती दिली. १४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस.फोर्ट स्टिकींग’ या जहाजाचा स्फोट होउन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणा-या अग्निशमन सेवेतील शहिदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणा-या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अपर्ण केली जाते. आगीच्या धोक्या संबंधात जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ व १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात येतो. अग्निशमन सुरक्षा कार्यात कर्तव्य बजावत असताना नागपूर महानगरपालिकेच्याही अधिकारी, कर्मचा-यांनी हौतात्म्य पत्करले. त्यात मनपा मुख्यालयातील अग्निशमन केंद्रात केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत गुलाबराव कावळे हे २८ नोव्हेंबर १९८१ ला इमामवाडा पोलिस चौकीजवळ घराला लागलेल्या आगीत बचाव कार्य करीत असताना विटांची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली व त्यात ते गंभीररित्या जखमी झाले, त्यात त्यांचे निधन झाले. १९ जानेवारी २००० रोजी कामठी रोडवरील चॉक्स कॉलनी येथे एल.पी.जी. कुकींग गॅसचे सिलेंडर लिकेजच्या घटनेवर बचावकार्य करीत असताना अचानक आगीचा भडका उडाला त्यात अग्निशमन विभागाचे ३ कर्मचारी गंभीररित्या भाजले. त्या तिघांपैकी अग्निशमन विमोचक प्रभू कुहिकर यांचे १२ फेब्रुवारी २००० रोजी रुग्णालयात निधन झाले. अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक रमेश ठाकरे हे २८ जून २००५ ला ग्रेट नागरोड येथील इमारतीला आग लागलेली असताना इमारतीच्या आत शिरून अग्निशमनाचे कार्य करीत असताना अचानक इमारत कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाद्वारे शहरातील नागरिकांना ९ अग्निशमन केंद्र, १ अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, १ आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येते, असेही त्यांनी सांगतिले.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.
वार्षिक ड्रिल स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
अग्निशमन विभागातर्फे ९ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या वार्षिक ड्रिल स्पर्धेतील विजेत्यांना मनपा आयुक्त व प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. वार्षिक ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारे त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र (१ मिनिट १० सेकंद), द्वितीय क्रमांक लकडगंज अग्निशमन केंद्र (१ मिनिट ११ सेकंद) आणि तृतीय सक्करदरा अग्निशमन केंद्र (१ मिनिट १२ सेकंद) यांना विजयी चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय वैयक्तिक शिडी ड्रिल स्पर्धेतील विजेता बबन जाधव (२६ सेकंद), वैयक्तिक ड्रिल स्पर्धेतील विजेते सुरेश आत्राम (२९ से.), राजू पवार (२९ से.), प्रवीण गिरी (३० से), एस.डी. दुबळे (३० से) यांच्यासह वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणारे मिलींद अंधारे, सुरेश आत्राम, पी.व्ही. झाडे, शरद ढोबळे, राजू आदमने, नितीन वैद्य, एस.डी. निखार, कालीचरण छत्रे यांनाही यावेळी प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
वर्षभरात अग्निशमन विभागाने हाताळलेल्या विविध दुर्घटनांचा गोषवारा
आगीच्या घटना
अग्निशमन विभागात 01/04/2021 ते 31/03/2022 या कालावधीत शहरातील एकुण 652 आगी लागल्या ज्यामध्ये लहान 357 , मध्यम 116 , व 110 मोठया आगीचा समावेश आहे. त्यामध्ये 17,60,94,860 (सतरा कोटी, साठ लक्ष, चौऱ्यान्नव हजार आठशे साठ) रुपयाचे अंदाजे नुकसान झाले तर 54,61,96,700 (चौपन्न कोटी, एकसष्ठ लक्ष, छान्नव चार हजार सातशे ) रुपयाची मालमत्ता वाचविण्यात आली.
आगीच्या घटना व्यतीरीक्त इतर आपातकालीन एकुण 590 घटनांची सूचना विभागास प्राप्त झाली. त्यामध्ये विहीर, तलाव, नदी व इतर घटनांचा समावेश असून त्यामध्ये एकुण जख्मी 54 त्यात 18 स्त्रिया व 36 पुरुष जखमी झाले तसेच मृतमध्ये 99 त्यामध्ये 10 स्त्रिया व 89 पुरुषांना मृत अवस्थेत काढण्यात आले. ज्यामध्ये घर पडले-20, झाड पडले -111, गॅस कॉल- 12,प्राणी कॉल – 211, पक्षी -34,अपघात – 07, इतर कॉल – 46 समावेश आहे.
अग्निशमन विभागाचे मुळ कार्य नसतांना देखील 2348 दुषीत विहीरीचा उपसा करण्यात आला. त्यामध्ये 247 विहीरीचा शुल्क आकारुन उपसा करुन नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार लावलेला आहे.
नागपूर शहराबाहेर दिलेली सेवा
विभागाने शहराबाहेर एकुण 63 आगीच्या वर्दीवर अग्निशमनाचे कार्य केले आहे.म.न.पा.अग्निशमन विभागाद्वारे शहराच्या बाहेरील दुर्घटनामध्ये अग्निशमनाचे कार्य करुन नागपूर महानगरपालिकेचे नाव उज्जवल केलेले आहे.या आगीमध्ये रु.32,25,31,000 (बत्तीस कोटी पंचवीस लक्ष एक्कतीस हजार) ची हानी झालेली असून अग्निशमन विभागाच्या जलद कार्यामुळे कोटयावधी रुपयाची मालमत्ता रु. 51,05,45,000 (एक्कावन्न कोटी, पाच लक्ष, पंचेचाळीस हजार) वाचविण्यात यश आलेले आहे.
विभागाचे उत्पन्न
विभागातर्फे दिनांक 01/04/2021 ते 31/03/2022 दरम्यान इमारत तथा व्यवसायाकरीता नाहरकत प्रमाणपत्राद्वारे , अग्निशमन सेवा शुल्क, निरीक्षण शुल्काद्वारे पाणी पुरवठा, विहीर उपसा, तसेच म.न.पा. हद्यीबाहेर पुरविण्यात आलेल्या अग्निशमन सेवा मार्फत असे एकुण रु.2,33,38,249 म.न.पा.ला उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये विशेषत: अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागामार्फत महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 चे कलम 13 नुसार विभागाने यापुर्वी दिलेल्या प्रथम ना हरकत प्रमाणपत्र धारक /भोगवटदार यांच्याकडून प्रामुख्याने रूपये 16,17,257(सोळा लाख सतरा हजार दोनशे सत्तावन्न) 1% वार्षीक शुल्क वसुल केले आहे.
जनजागृती तथा मॉक ड्रील
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यत एकुण 265 उपक्रम राबविण्यात आले, म्हणजे शासकीय कामकाजाच्या प्रत्येक दोन दिवसात एक याप्रमाणे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. त्यात शाळा कॉलेज, रूग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती, इतर संस्था जसे – आयुष हॉस्पीटल, शालीनीताई मेघे हॉस्पीटल, किंग्सवे हॉस्पीटल, रामदेवबाबा कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पीटल, मे. ऑल इंडीया इन्स्टीटयुट, मे. एअरपोर्ट फायर स्टेशन, धंतोली झोन क्र. 04 क्षेत्रीय कार्यालय मे. नागपूर कॅन्सर हॉस्पीटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल, मे. राजवाडा पॅलेस, प्राथमीक आरोग्य केंद्र UPHC गंजीपेठ, दक्षिण पुर्व मध्य रेल्वे, इतवारी रेल्वे स्टेशन, A.G.Office, पोदार इन्टरनॅशनल स्कुल, मे. बॅकवर्ड क्लास युथ रिलीफ कमीटी नागपूर, लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था, भारतीय विद्या भवन, महामेट्रो स्टेशन टेलीफोन एक्सचेंज, सी.ए. रोड, बी.ए.पी. स्वामी नारायण संस्था , कुंदनलान गुप्ता उर्दु माध्यमीक शाळा, मेट्रो रेल्वे स्टेशन संत्रा मार्केट, मे. नारायण ई- टेक्नो स्कुल, जसलीन हॉस्पीटल धंतोली, मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.खापरी ,मे. एअर फोर्स स्टेशन सोनेगाव इत्यादी संस्थाने, शासकीय कार्यालय, शैक्षणीक संस्थेमधील व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी , शिक्षक व शिक्षीका यांना जनजागृती उपक्रमातून “आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना” याबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
फायर ऑडीट
अग्निशमन विभागातर्फे शासनामार्फत प्राप्त निर्देशानुसार शहरातील एकुण 123 शासकीय निमशासकीय उपक्रमाच्या इमारती व रूग्णालयाचे परिक्षण (Fire Audit) करण्यात आले आहे.
भविष्यातील नियोजन
1. विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सुरक्षेकरिता एकुण 170 अग्निरोधक फायरसुट खरेदी करण्यात येणार आहे.
2. वाठोडा परिसरातील लोकसंख्येचे अनुपातानुसार अग्निशमन केंद्र नसल्याने या भागातील आरक्षीत असलेल्या जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याकरीता अग्निशमन केंद्राचे निर्माण कार्य सुरू होणार आहे. सदर अग्निशमन केंद्र अग्निशमन सेवेत समाविष्ट झाल्यानंतर या भागातील नागरीकांना अग्निशमन सेवा योग्यरित्या पुरविता येईल.
3. कळमना अग्निशमन केंद्रातील अतिरिक्त जागेवर जलतरन केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे.
4. विभागातील कर्मचाऱ्यांकरीता 50 नग B.A.Set ची खरेदी करण्यात येत आहे.
5. अग्निशमन विभागात उपलब्ध अग्निशमन वाहनांमध्ये नव्याने 03 अग्निशमन वाहने खरेदी करण्याचे प्रास्तावित आहे.
सध्या उपलब्ध स्थानके, मनुष्यबळ तथा साधने
अग्निशमन विभागात वेगवेगळया पदावर 164 कर्मचारी कार्यरत आहेत . विभागात 21 फायर टेंडर, 2 वॉटर टॅंकर, 1 नग 42 मीटर उंच टर्न टेबल लॅडर (TTL), 1 नग 32 मीटर उंच हैड्रोलीक प्लॅटफार्म, 1 फोम टेंडर, 4 लहान टेंडर, 2 आर.आय.व्ही, 1 देवदुत, 14 बोलेरो व 7 यामाहा व 4 वॉटर मिस्ट मोटर सायकल , 2 ट्रूप कॅरीयर,4 पीक अप व्हॅन, 4 सुमो, 1 क्वालीस व 3 रबर बोट कार्यरत आहेत.
अग्नीशमन विभागात आस्थापना नुसार 5 अग्निशमन केंद्र होती (गंजीपेठ, सिव्हील, लकडगंज, पाचपावली व कॉटन मार्केट) त्यानंतर सन 1994 ला सक्करदरा अग्निशमन केंद्र, सन 2007 ला कळमना अग्निशमन केंद्र, सन 2008 ला नरेंद्रनगर अग्निशमन केंद्र, सन 2011 ला सुगतनगर अग्निशमन केंद्र व ऑक्टोंबर 2019 ला त्रिमुर्तीनगर अग्निशमन केंद्र नव्याने सुरू करण्यात आले असे एकुण 9 अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहेत.