ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन
नागपूर : नागपूर शहरातील नाग, पिवळी या नद्यांसह इतर नाल्यांवरील १५ मीटरच्या आत येणा-या रहिवाश्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन प्रभाग २६चे नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हाधिकारी आर.विमला यांना दिले.
नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व इतर नाल्यांवरील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये गरीब नागरिक राहतात. मागील जवळपास २५ वर्षांपासून या नागरिकांचे येथे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये नोटीस बजावण्यात येत आहे.
व ह्या कारवाई करण्याच्या भितीमुळे या भागांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. येथील रहिवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व नागरिकांना राज्य शासनाच्या नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांना केलेली आहे.