Published On : Sat, Sep 25th, 2021

ज्येष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करणार : महापौर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकारातून सिनिअर सिटीजन कौनसिल ऑफ नागपूरच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

यासंदर्भात महापौर कक्षात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीला आमदार गिरीश व्यास, सिनिअर सिटीझन कौनसिलचे अध्यक्ष मनोहर खर्चे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव सुरेश रेवतकर, सहसचिव वासुदेव वाकोडीकर, सभापती हरिश दिकोंडवार, समन्वयक डॉ. संजय चिलकर, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर व अन्य अधिकारी उपसथित होते.

बैठकीत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन करीत रूपरेखा ठरविण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात काही योजना जाहीर केल्या आहे.

नागपूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुदृढ आरोग्याबाबत मनपा कटिबद्ध असून त्यांचा यथोचित सन्मान करणे आणि मनपाच्या योजनांचा लाभ देणे हे आमचे कर्तव्य असून त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.