Published On : Mon, Aug 9th, 2021

मोरभवन बस स्थानकावरील वॉटर एटीएमचे लोकार्पण

Advertisement

नागपूर : नागपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजबाग मार्गावरील शहर बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांकरिता मनपा जलप्रदाय विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन अद्ययावत वॉटर एटीएमचे लोकार्पण मनपा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते रविवारी ८ ऑग़स्ट रोजी करण्यात आले.

यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखाधिकारी विनय भारद्वाज, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, गिरीश महाजन, निखील, शुभम तसेच वॉटर हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. सचिन हे उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, शहर बस वाहतुकीअंतर्गत सर्वाधिक बसेसचे मार्गक्रमण महाराजबाग रोड स्थित मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या शहर बस स्थानकावरून होत असते, त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. तेथे प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याची समस्या ही गेले अनेक वर्षापासून होती. बसेसच्या वाहक व चालक यांनादेखील पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे वॉटर एटीम उभारण्यासाठी जलप्रदाय विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. तेथे अल्पावधीतच नवीन वॉटर एटीएम तयार करण्यात आले .

या वॉटर एटीएममुळे येथील स्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण झालेले असून मनपावर या एटीएमचा कुठलाही आर्थिक भुर्दंड यामुळे पडणार नाही . वॉटर हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे या एटीएमची देखरेख व दैनंदिन सुविधा पुरवण्याची जबाबदारी सोपवलेली असून अत्यल्प दरात शुद्ध आरोचे पाणी प्रवाशांना व नागरिकांना आजपासून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या वॉटर एटीएमचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती बंटी कुकडे यांनी यावेळी केले.