Published On : Sat, Jul 3rd, 2021

वंदे मातरम् हेल्थ पोस्ट निर्मितीच्या कार्याला गती द्या : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

झोननिहाय कार्यवाहीचा घेतला आढावा : १ ऑगस्टपर्यंत कार्य पूर्ण करण्याचे निर्देश

नागपूर : शहरात राहणा-या तळागाळातील, वस्तीत राहणा-या गरीब व गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या हेतूने वंदे मातरम् जनआरोग्य योजेनेंतर्गत नागपूर शहरामध्ये ७५ ‘हेल्थ पोस्ट’ची निर्मिती केली जाणार आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनाला या सर्व हेल्थ पोस्टचा शुभारंभ करण्याचा मनपाचा मानस असून त्यादृष्टीने कार्याला गती द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात साकारण्यात येणा-या ७५ ‘हेल्थ पोस्टच्या’ कार्यासंबंधी स्वत: महापौरांनी शुक्रवारी (ता.२) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, रवींद्र भोयर, उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अविनाश भूतकर, धनंजय मेंढुलकर, विजय गुरूबक्षाणी आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौरांनी दहाही झोनमध्ये उपलब्ध जागा, तेथील अवस्था व तेथे आवश्यक कार्य या सर्व बाबींची माहिती व त्यात येणा-या अडचणी जाणून घेतल्या. काही अडचणींचे त्वरीत निराकरणही केले. शहरातील गरीब तसेच सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण केल्या जाव्यात यासाठी जिथे आरोग्य सुविधा नाहीत त्या ठिकाणी हे ‘हेल्थ पोस्ट’ निर्माण केले जाणार आहेत. या सर्व ‘हेल्थ पोस्ट’मध्ये रुग्णांची तपासणी व औषधोपचार (ओपीडी) केले जाईल. रुग्णाला गरज पडल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था संबंधित ‘हेल्थ पोस्ट’मध्ये असेल. ७५ ‘हेल्थ पोस्ट’ च्या निर्मितीसाठी इमारत बांधकाम, वीज बिल आणि पाणी याचा खर्च मनपा करणार आहे. उर्वरीत डॉक्टर, परिचारीका, औषधी यासाठी लागणारा संपूर्ण खर्च संबंधित सामाजिक संस्था करणार आहेत. शहरातील विविध भागात निर्माण होणा-या ‘हेल्थ पोस्ट’ना संबंधित भागातील शहीद जवानांची नावे देण्यात येणार आहेत.

नागपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘वंदे मातरम् जनआरोग्य योजना’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. त्यामुळे या कार्यामध्ये कुठलाही निष्काळजीपणा न करता प्राधान्याने या कार्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. झोनमधील निर्धारित जागा व तेथे करावयाच्या आवश्यक कार्यासंबंधीचे प्राकलन संबंधित विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावे. ‘हेल्थ पोस्ट’च्या निर्मितीचे कार्य तातडीने पूर्ण व्हावे यासाठी या कार्याच्या गतीकडे विशेष लक्ष देण्यात यावे. येत्या १ ऑगस्टपर्यंत ७५ पैकी जास्तीत जास्त ‘हेल्थ पोस्ट’ पूर्णत्वास यावेत, यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.