1000 खाटांची असेल उपलब्धता
सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज हॉस्पिटल
साकोली, पवनी येथील रुग्णालयाची पाहणी
भंडारा:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता वरठी येथील सनफ्लॅग कंपनीजवळ प्रस्तावित जम्बो कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी आज पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. एक हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयाची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
आमदार अभिजित वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व अधिकारी उपस्थित होते. हे कोविड हॉस्पिटल पूर्व विदर्भातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल राहणार असून यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहतील आणि या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचार घेता येईल. सदर हॉस्पिटल उभारणीचे कार्य लवकरच सुरु होईल. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
साकोली, पवनी येथील रुग्णालयाची पाहणी
साकोली व पवनी येथील कोविड केअर हॉस्पिटला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोई सुविधांचा आढावा त्यांनी या भेटीत घेतला. रुग्णांना नियमित उपचार द्यावे, जेवणाचा दर्जा उत्तम असावा, स्वच्छता ठेवावी व रुग्णांचे समुपदेशन, योगा इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी या भेटीत सांगितले. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, रविद्र राठोड, तहसिलदार पवनी निलीमा रंगारी यावेळी उपस्थित होते.
लसीकरण केंद्राला भेट
पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील आरोग्य केंद्रात असलेल्या लसीकरण केंद्राला पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर सोबत होते. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. प्रत्येक नागरिकांनी लस आवश्य घ्यावी. लसीमुळेच आपले जीवन सुरक्षित होणार आहे. आजपासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्याचा लोकोपयोगी निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.










