Published On : Tue, Apr 6th, 2021

सावधान: नियम मोडणाऱ्यांची पोलीसांशी गाठ

Advertisement

• होणार दंडात्मक कारवाई
• ‘ब्रेक दि चैन’ कठोर अंमलबजावणी
• विना मास्क होणार दंड

भंडारा:- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत मंगळवार पासून कठोर निर्बंध जारी केले आहेत. भंडारा जिल्ह्यात या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास पोलीस विभागाशी गाठ असून सदर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी 07 ते रात्रौ 08 दरम्यान जमावबंदी राहणार आहे. या अंतर्गत पाच पेक्षा अधिक लोकांच्या जमावास बंदी राहील. शुक्रवार रात्रौ 08 ते सोमवारी सकाळी 07 या काळात कोणत्याही व्यक्तीस वैध कारणाशिवाय किंवा सदर आदेशात नमूद अत्यावश्यक सेवेच्या कामाशिवाय सार्वजनिक रित्या बाहेर निघण्यास- फिरण्यास पुर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांचे जिल्हावासीयांकडून काटेकोर पालन होणे अपेक्षित असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दि चैन’ धोरण जाहीर केले असून लोकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात येऊ नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत गर्दी करू नये, कार्यक्रम आयोजित करू नये असे निर्देश आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.

वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना वरील आदेशातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ, सर्व दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे पुर्णतः बंद राहतील. दळणवळण सोयी सुविधा या शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार असतील. रात्रौकालीन संचारबंदी, अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक बाबी, दुकाने, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, खाजगी वाहतूक, करमणूक, उपहारगृहे व बार, धार्मिक स्थळे, हेअर सलून, ब्युटी पार्लर, वृत्तपत्रे, शाळा महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावरील खाद्य दुकाने, उत्पादनक्षम क्षेत्र, ऑक्सिजन उत्पादक, इकॉमर्स, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बांधकाम याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांनी 5 एप्रिल 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

विना मास्क होणार दंड
कोरोना या संसर्गजन्य आजारावर मास्क हे अत्यंत प्रभावी औषध असून संक्रमण राखण्यासाठी प्रत्येकाने योग्य रितीने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस सुद्धा दंडात्मक कारवाई करणार आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे व पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement