Published On : Sat, Mar 6th, 2021

रामेश्वरी, कुशीनगर येथे बाजार व उद्यानाचा मार्ग मोकळा

Advertisement

नागरिकांच्या तक्रारींवर महापौरांनी केली परिसराची पाहणी

नागपूर : रामेश्वरी येथील कुशीनगर येथे रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे परिसरात बाजारासाठी जागा उपलब्ध करून देणे व ज्येष्ठांकरिता उद्यानासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापौरांना करण्यात आली. या मागणीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी परिसराला भेट देउन पाहणी केली. कुशीनगर परिसरामध्ये बाजारासाठी निर्धारित जागा आरक्षित आहे याशिवाय महाराष्ट्र परिवहन महामंडळासाठी आरक्षित दुसरी जागा सुद्धा उपलब्ध आहे. या जागेचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी उद्यान निर्मिती करणे व बाजाराच्या आरक्षित ठिकाणी बाजारासह सामुदायिक सभागृह निर्मिती करण्याचे निर्देश प्रशासनाला महापौरांनी दिले आहेत. त्यामुळे रामेश्वरी, कुशीनगर भागामध्ये बाजार व उद्यान या दोन्ही समस्या मार्गी लागल्या असून लवकरच या कार्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दयाशंकर तिवारी यांनी महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रामेश्वरी, कुशीनगर भागातील नागरिकांनी भेट घेउन रस्त्यावर भरणा-या बाजाराची तक्रार केली होती. याशिवाय मनपाच्या स्थापना दिनी माजी महापौर पांडुरंग हिवरकर यांच्या सत्कारासाठी महापौर दयाशंकर तिवारी त्यांच्या निवासस्थानी गेले असता त्या ठिकाणी शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेउन बाजार हटविण्याची विनंती केली होती. या भागात रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा होतोच शिवाय नागरिकांच्या घरापुढेच दुकाने असल्याने त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे बाजार बाजारासाठी आरक्षित ठिकाणी स्थानांतरीत करण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय गुरूवारी (ता.४) परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी निवेदन देउन परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानाची निर्मिती करण्याची सुद्धा मागणी केली होती.

यानंतर शुक्रवारी (ता.५) महापौर दयाशंकर तिवारी यांनी परिसरात भेट देउन पाहणी केली. यावेळी धंतोली झोन सभापती वंदना भगत, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, स्थानिक नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे, उपायुक्त मिलींद मेश्राम, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौरांसह पदाधिकारी व अधिका-यांनी परिसरात असलेल्या चार मैदानांचा दौरा केला. यापैकी एका मैदानाचे महाराष्ट्र परिवहन महामंडाळासाठी आरक्षण असल्याचे निदर्शनास आले. मात्र याठिकाणी बसेस जाण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने महामंडळाद्वारे नागपूर सुधार प्रन्यासला जागेची आवश्यकता नसल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. त्यामुळे या जागेवरील महामंडळाचे आरक्षण बदलून त्यावर उद्यान निर्मिती संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

याशिवाय बाजारासंदर्भात येणा-या तक्रारी लक्षात आणून दिली. परिसरातील एक मैदान २०१२मध्ये तत्कालीन स्थायी समिती सभापती व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात बाजारासाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या मैदानाची महापौरांनी पाहणी केली. सदर ठिकाणी बाजारासह मोठे सामुदायिक सभागृह व जिम तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रस्ताव महापौरांनी नागरिकांना सूचविला. महापौरांच्या या प्रस्तावाचे नागरिकांनी स्वागत केले. या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement