Published On : Sun, Oct 18th, 2020

पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांचा सत्कार

नवरात्रीनिमित्त ‘सन्मान स्त्री कर्तृत्वाचा’ : महापौर संदीप जोशी यांचा उपक्रम

नागपूर : नवरात्रीचे औचित्य साधून नागपुरातील नऊ रणरागिणींचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम ‘सन्मान स्त्री कर्तृत्वाचा’ या माध्यमातून महापौर संदीप जोशी करीत आहेत. पहिल्या दिवशी नागपूर नगरीच्या प्रथम महिला महापौर कुंदाताई विजयकर यांचा त्यांनी सत्कार केला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरात अनेक महिला अशा आहेत ज्यांनी स्वकर्तृत्वावर त्यांच्या क्षेत्रात नाव कमावले. विपरीत परिस्थितीवर मात करीत त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यशोशिखर गाठले. त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा आज शहरातील अन्य महिलांना मिळत असून त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. नवरात्र म्हणजे आदीशक्तीचा उत्सव. स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा सोहळा. हेच औचित्य साधून नवरात्रातील नऊही दिवस विविध क्षेत्रातील एका महिलेचा प्रातिनिधिक सत्कार करून ‘सन्मान स्त्री कर्तृत्वाचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा मानस महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

याच मालिकेत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून महापौर संदीप जोशी यांनी नागपूर नगरीच्या पहिल्या महापौर कुंदाताई विजयकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे उपस्थित होत्या. मनपाचा दुपट्टा, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन महापौर संदीप जोशी यांनी श्रीमती विजयकर यांनी राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नागपूरचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या कन्या असलेल्या कुंदाताई विजयकर यांचा राजकीय प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कुशल प्रशासक आणि क्रीडा संघटक म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्ष असलेल्या कुंदाताई त्तत्कालिन विदर्भ महिला क्रिकेट असोशिएशन, हॅण्डबॉल असोशिएशन आदी संघटनांमध्ये पदाधिकारी होत्या. क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती संघटक पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. अशा कुंदाताई विजयकर यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी यावेळी काढले.

सत्कारप्रसंगी भावुक होऊन श्रीमती कुंदाताई विजयकर म्हणाला, पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून महापौर संदीप जोशींनी आपला सत्कार करावा, याचा आपल्याला अत्यंत आनंद आहे. हा सत्कार माझा नसून माझ्यासोबत राजकारणात आणि क्रीडा क्षेत्रात खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि तमाम महिलांचा असल्याचे उद्‌गार त्यांनी काढले. महापौर संदीप जोशी यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असेही त्या म्हणाल्या.

Advertisement
Advertisement