महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे यांचे निर्देश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये ‘फुड स्टॉल’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला बचत गटांच्या उत्थानासाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करा, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे यांनी दिले.
विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी (ता.३) महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. समिती सभापती कक्षामध्ये आयोजित बैठकीत समिती सभापती संगीता गि-हे यांच्यासह उपसभापती दिव्या धुरडे, सदस्या मनिषा अतकरे, विरंका भिवगडे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, कनिष्ठ अभियंता सविता उजवणे आदी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने व महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे यासाठी मनपातर्फे महिला बचत गटाद्वारे संचालित होणारे ‘फुड स्टॉल’ सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी दहाही झोनमध्ये जागा निश्चीत केली जाईल. महिला बचत गटांना ११ महिन्यांसाठी हे ‘फुड स्टॉल’ चालविण्यासाठी देण्यात येण्याची योजना आहे. यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश समिती सभापतींनी दिले.
‘पाळणा घर’साठी जागेची पाहणी
मनपा मुख्यालयात कार्यरत महिलांच्या लहान मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने मुख्यालयात ‘पाळणा घर’ निर्माण करण्यात येणार आहे. यासंबंधी मुख्यालतील उपलब्ध जागेची यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे यांच्यासह सर्व सदस्यांनी पाहणी केली. मनपामध्ये कार्यरत महिलांच्या लहान मुलांच्या सुरक्षा आणि संगोपनासाठी मुख्यालयात ‘पाळणा घर’ असणे आवश्यक आहे. या ‘पाळणा घरा‘च्या संचालनासाठी स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून येथे दिवसभर मुलांची काळजी घेतली जाणार आहे.
दिव्यांग अधिकारी नेमणुकीचा विषय विधी समितीकडे
दिव्यांगांच्या समस्या व त्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी मनपामध्ये दिव्यांग अधिका-याची नेमणूक करण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. दिव्यांग अधिका-याच्या नेमणुकीसंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी सभागृहामध्ये विषय मांडला होता.
या विषयावर चर्चा करून नेमणुकीसंदर्भात सदर विषय महिला व बालकल्याण समितीकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (ता.३) बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित विषयाशी निगडीत कायदेशीर बाबींची पडताळणी करून योग्य निर्णय घेण्यासंदर्भात विषय विधी समितीकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सदर निर्णयाला बैठकीत सर्व सदस्यांकडून एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.










