‘मम्मी पापा यु टू’ अभियान चित्रकला स्पर्धा : ४ हजारावर स्पर्धकांनी घेतला सहभाग
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘मम्मी पापा यु टू’ अभियानांतर्गत ‘पगमार्ग’ व ‘स्वच्छ असोसिएशन’च्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला शहरातील विद्यार्थी व पालकांची उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. रविवारी (ता.१९) महाराजबाग येथे ४ हजारावर विद्यार्थी आणि पालकांनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
याप्रसंगी महापौर संदीप जोशी, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक किशोर जिचकार, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडेच्या पर्यावरण विभागाचे उपव्यवस्थापक देवेंद्र महाजन, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहायक अधिष्ठाता डॉ.पंचभाई, स्वच्छ असोसिएशनच्या अध्यक्ष अनसुया काळे छाबरानी, पगमार्गचे सीईओ हरीश आदित्य, स्वच्छ असोसिएशनचे सचिव शरद पालेवाल, बाबा देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी टाकाउ वस्तूंपासून निर्मित श्रीगणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
६ ते १० वर्ष, ११ ते १७ वर्ष, १८ ते ५५ वर्ष आणि ५५ वर्षापुढील वयोगटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटातील स्पर्धकांनी ग्लोबल वार्नीगबाबत जनजागृती, पर्यावरण संरक्षण, ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ या तीन ‘आर’चे महत्व, बाल महिला सुरक्षा या विषयावर कॅनव्हासवर चित्र रेखाटली. स्पर्धेतील विजेत्यांना पगमार्ग व स्वच्छ असोसिएशनच्या वतीने एकूण १ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.