Published On : Thu, Jan 2nd, 2020

शिमला नव्हे, हे तर खामला

नागपूर: सलग दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे नागपूरकरांना थंड हवेच्या ठिकाणी राहात असल्याचा अनुभव मागील दोन दिवसांपासून येतो आहे. सततचा पाऊस, धुके, बोचरी हवा आणि वाढलेली थंडी यामुळे नागपूरकरांवर ‘हे शिमला आहे की खामला?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

हवामानखात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे मागील दोन ते तीन दिवसांपासून नागपुरात ढगाळ वातावरण अनुभवास येते आहे. मागील दोन दिवसांप्रमाणेच बुधवारीही असेच वातावरण संपूर्ण शहरात कायम होते. अगदी सकाळपासून मोठा गारवा आणि ढग असेच चित्र नागपुरात कायम होते. मंगळवारप्रमाणेच बुधवारी दुपारीही शहराच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे, आधीच्याच गारव्यात भर पडली आहे. पावसाच्या जोडीला सतत थंड हवा सुरू असल्याने हिवाळ्याचा बोचरा अनुभव गेले दोन दिवस नागपुरात येतो आहे. याशिवाय, विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुकेही दाटले आहे. धुक्यात हरवलेले नागपूर असे चित्र संपूर्ण दिवसभर कायम होते. केवळ सकाळी आणि सायंकाळीच नव्हे तर संपूर्ण दिवसभर आबालवृद्धांसह सर्व नागरिक स्वेटर्स, जॅकेटस, शाली, टोप्या आणि मफलर घालून फिरत होते. ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे उपराजधानीतील वातावरणात अचानक बदल घडवून आणला आहे.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हवामानखात्याच्या नोंदीनुसार, नागपुरात १३.४ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदविण्यात आले. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना जाणवणाऱ्या थंडीचे प्रमाण बरेच जास्त होते.

आजही राहणार पाऊस, वारा
बुधवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, नरखेड, भिवापूर, पारशिवनी, सावनेर, हिंगणा, काटोल, रामटेक, कळमेश्वर, नागपूर विमानतळ परिसर अशा सर्व भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली. मागील २४ ते ३६ तासांमध्ये नागपुरात ८ ते १० मिमी पावसाची नोंद केली जाणार आहे. गुरुवारीदेखील असेच वातावरण कायम राहणार आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि बोचरी हवा आणखी एक दिवस सहन करावे लागणार आहे. ३ जानेवारीपासून मात्र वातावरणात उघाड येणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement