Published On : Sun, Aug 29th, 2021

महिला पोलीस कर्मचा-यांना 8 तास, पोलीस आयुक्तांचा स्वागतार्ह निर्णय : आ.कृष्णा खोपडे

Advertisement

पुरुषांच्या बाबतीत देखील सकारात्मक विचार व्हावा, ही अपेक्षा

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी महिला पोलीस कर्मचा-यांच्या मेहनतीचे फळ त्यांना दिले. त्यांच्या परिवाराची मुलाबाळांची नीट देखरेख व्हावी, या दृष्टीने हा निर्णय निश्चितच स्वागतयोग्य आहे. महिला पोलीस कर्मचारी तासनतास प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून वाचलेला वेळ आपल्या परिवाराला व मुलाबाळांना देत होत्या. अनेक महिला ज्यांना घरापासून फार दूरवर कर्तवयावर जावे लागत होते. त्यांचे तर काय हल होत असतील, या शब्दातून व्यक्त करणे कठीणच आहे. अनेक महिला कर्मचा-यांच्या एखाद्या वेळेसच आपल्या परिवारासोबत सुखाचे दोन घास खायला मिळत होते.

कित्येकांची लहान मुले आपल्या आईच्या मातृत्वापासून वंचित राहत होत्या. वृद्ध आई-वडिलांची लेक आपल्या आई-वडिलांची सेवा करू शकत नव्हती. कदाचित पति महोदयांना सुद्धा वेळ देणे कठीणच होते. अनेकदा त्यांच्या संसारात या कारणामुळे वाद निर्माण होत होते. अशा अनेक नाना प्रकारच्या समस्यांना सामोरे जावून या महिला कर्मचारी कधीतरी सुखाचे दिवस येईल या आशेने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होत्या. पोलीस आयुक्तांच्या या साहसी निर्णयामुळे या महिला पोलीस कर्मचारी तर सुखावलेच, पण त्यांचे परिवाराला देखील आनंद वाटेल.

पोलीस आयुक्ताच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. मात्र पुरुषांच्या बाबतीत देखील सकारात्मक विचार करावा. कारण पुरुषांना सुद्धा रात्री-बेरात्री कधी 12 तर कधी 15 तास, आणि बंदोबस्त असला तर त्यांचे हाल त्यांनाच माहित, अशी त्यांची अवस्था असते. अनेक पुरुष कर्मचारी ज्यांच्या पत्नी सुद्धा कामकाजी आहेत. त्यांना अशावेळी अनेक अडचणी येतात.

या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यातील महिला व पुरुष दोघांनाही आठ तासाची ड्युटी केल्यास निश्चितच राज्यातील पोलीस कर्मचा-यांना सुगीचे दिवस येईल व ते पुन्हा जोमाने आपले कर्तव्य बजावू शकतील.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इच्छाशक्तीने साहसी निर्णय घेतल्यासंदर्भात वरील प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.