Published On : Wed, Dec 29th, 2021

७२ हजार बालकांना देणार मोफत जॅपनीज एन्सेफलाइटिस (जेई) प्रतिबंधात्मक लस

Advertisement

– शहरातील शासकीय – खासगी शाळांचा सहभाग; पालकसभांच्या माध्यमातून होणार जनजागृती

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात ३ जानेवारीपासून १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ७२ हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. हि लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात २९ डिसेंबर रोजी सर्व शासकीय आणि खासगी शाळांचे मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय पर्यवेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, बालरोगतज्ञ डॉ. इर्शाद अली शिवजी, आयएपी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. मोहम्मद साजिद यांनी उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितले की, जॅपनीज एन्सेफलाइटिस हा आजार धानशेती बहुल भागात डासांपासून होतो. चंद्रपूर शहर परिसर या डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे येथे या रोगापासून बालकांचे मृत्यूदेखील झाले आहे. भविष्यात बालकांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पहिल्या आठवड्यात शाळेत, अंगणवाडी, मदरशामध्ये जाणाऱ्या मुलांचे लसीकरण, पुढील दोन आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ही लस मोफत असून, खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे मनात शंका न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी जॅपनीज एन्सेफलायटिस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शाळॆत पालक सभा घेण्याच्या सूचना दिल्या.

‘जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण’ म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल ! ३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्या.

– डॉ. मंगेश गुलवाडे
अध्यक्ष, आयएमए, चंद्रपूर

भविष्यात बालकांचे मृत्यू होऊ नयेत, यासाठी मनात कोणतीही शंका न ठेवता ‘जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण’ केले पाहिजे. ३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्या.
– डॉ. इर्शाद अली शिवजी
बालरोगतज्ञ्, चंद्रपूर

जपानीज एन्सेफलिटीस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्या.
– डॉ. साजिद अली
वैद्यकीय पर्यवेक्षण अधिकारी, जागतिक आरोग्य संघटना