नागपूर – “कौशल्य, शिस्त आणि तंत्रज्ञानाचा संगम” या संकल्पनेखाली नागपूर शहरात २९ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित केला जात आहे. हा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा पोलीस समारंभ दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतला जातो. मागील वर्षी ६८ वा मेळावा झारखंडच्या रांची येथे संपन्न झाला होता.
या वर्षी महाराष्ट्रात हा मेळावा घेण्याचे ठरल्यामुळे नागपूर शहर निवडले गेले आहे. उद्घाटन सोहळा दिनांक २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम, नागपूर येथे पार पडेल. उद्घाटन प्रसंगी भारतभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
हा मेळावा पोलीस दलातील व्यावसायिक कौशल्य, कार्यपद्धती सुधारणा, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, आधुनिक तपास पद्धतींचा अनुभव घेणे आणि तंत्रज्ञानाचा आदान-प्रदान करण्यासाठी आयोजित केला जातो. या स्पर्धेमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि आधुनिकतेकडे वाटचाल होण्यास मदत होते.
स्पर्धा सहा विषयांमध्ये पार पडणार आहे –
1.कॉम्प्युटर अवेअरनेस
2.पोलीस डॉग कॉम्पिटिशन
3.पोलीस व्हिडिओग्राफी
4.अँटी सबोटेज चेक
5.सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन
6.पोलीस फोटोग्राफी
स्पर्धा नागपूरच्या विविध ठिकाणी पार पडणार आहेत.
-कॉम्प्युटर अवेअरनेस: रामदेव बाबा अभियांत्रिकी विद्यापीठ, गिट्टीखदान
-पोलीस डॉग स्पर्धा: राज्य राखीव पोलीस बल, हिंगणा रोड
इतर चार विषय: पोलीस प्रशिक्षण केंद्र, बजाजनगर
देशभरातून २९ संघ, १३२७ पोलीस अधिकारी व अमलदार, आणि १४४ डॉग्स या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सहभागी स्पर्धकांसाठी राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय सुविधा नागपूर शहरातील दर्जेदार ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाची सोय देखील केली आहे.
समारोप सोहळा ३ एप्रिल २०२६, संध्याकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम, नागपूर येथे पार पडेल. समारोप प्रसंगी मा. श्री. नित्यानंद गंगाविष्णु रॉय, केंद्रीय गृह राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी, गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉन्झ मेडल्स वितरण केले जातील.










