
रामटेक — रामटेक विधानसभा क्षेत्रातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांत सोमवारी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 67,293 मतदारांपैकी जवळपास 46 हजारांहून अधिक मतदारांनी मतदान करून 69.99 टक्के मतदानाची नोंद केली. दिवसभर शांत आणि सुरळीत वातावरणात मतदान पार पडले.
कन्हान नगरपरिषद क्षेत्रात मतदानाची सुरूवात धीम्या गतीने झाली; मात्र दुपारनंतर केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी दिसून आली. येथे 62.37 टक्के मतदान झाले असून महिलांची उपस्थिती विशेष जाणवत होती. पारशिवनी नगरपंचायतीत मात्र दिवसभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्व चार क्षेत्रांमध्ये पारशिवनीने सर्वाधिक 79.49 टक्के मतदानाची नोंद केली. युवक, महिला आणि ज्येष्ठ मतदारांनी सकाळपासूनच बूथवर रांगा लावत मतदान प्रक्रिया जोरात ठेवली.
रामटेक नगरपरिषद क्षेत्रात सकाळीच काही केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसल्या. अखेरपर्यंत शांततेत मतदान पार पडले आणि 13,404 मतदारांनी आपला हक्क बजावला. कांद्री नगरपंचायतीतही मतदान सुरळीत झाले असून 6,859 मतदारांनी मतदान केले. कुठेही मोठा अनुशासनभंग किंवा गोंधळ झाल्याची नोंद नाही.
चारही भागांत पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत राहिली. आता या सर्व भागांतील उमेदवारांचे भविष्य EVM मध्ये लॉक झाले असून निकालाची उत्कंठा मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.









