Published On : Thu, Nov 2nd, 2017

अतिदूर्गम भागातील 6 हजार महिलांना ‘माहेर’मुळे मिळाले सुरक्षित मातृत्व – डॉ. संजीव जयस्वाल


नागपूर: अतिदूर्गम आदिवासी तसेच दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असलेल्या वाड्या व गावांमध्ये राहणाऱ्या महिलांना सुरक्षित मातृत्व मिळावे यासाठी विभागात सुरु करण्यात आलेल्या 51 माहेर घराच्या माध्यमातून मागील तीन वर्षात 6 हजार 068 महिलांना सुरक्षित मातृत्व लाभले असल्याची माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांनी दिली.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे माध्यम प्रतिनिधीसोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात डॉ. संजीव जयस्वाल यांनी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनासंदर्भात माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

ग्रामीण व अतिदूर्गम भागातील महिलांना बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच अतिवृष्टी व पूरा सारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी बाळंतपणापूर्वीच राहण्याची सुविधा ‘माहेर घर’ या योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आली आहे. गर्भवती महिलेला प्रसुती पूर्वी माहेर घराच्या माध्यमातून वैद्यकीय तसेच भोजनासह आवश्यक सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येतात. गर्भवती महिलेसोबत सहाय्यक म्हणून राहणाऱ्या महिलेला तीची दैनंदिन मजुरीचा मोबदला म्हणून दरदिवशी शंभर रुपये सुध्दा या योजनेअंतर्गत देण्यात येते.

नागपूर विभागात 51 माहेर घर सुरु असून या मध्ये गोंदिया जिल्हयात 13, चंद्रपूर जिल्हयात 7, तर गडचिरोली जिल्हयात 31 माहेर घर असून सर्व माहेर घर आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षित बाळंतपण ही संकल्पना असल्याचे सांगतांना डॉ. संजीव जयस्वाल म्हणाले की, विभागात मागील तीन वर्षात 6 हजार 068 सुरक्षित मातृत्व झाले असून यामध्ये सन 2013-14 या वर्षात 2 हजार 169, सन 2014-15 या वर्षात 1 हजार 913, तर 2015-16 या वर्षात 1 हजार 986 सुरक्षित बाळंतपण झाले आहेत.

नागपूर विभागात सरासरी 98 टक्के बाळंतपण हे आरोग्य केंद्र अथवा संस्थात्मक सुविधा असलेल्या ठिकाणी होत असल्याचे सांगतांना डॉ. जयस्वाल म्हणाले की, जिल्हयात एलथ्री 25 (डिलवरी पाँईट) ऑपरेशनची सुविधा आहेत. यामध्ये भंडारा जिल्हयात 3, चंद्रपूर 5, गोंदिया 4, गडचिरोली 4, वर्धा 3 व नागपूर जिल्हयात 6 केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावर एप्रिल-2016 पासून 9 हजार 023 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही केंद्रे जिल्हा आरोग्य केंद्रा व्यतिरिक्त असल्यामुळे बाळंतपणाच्या वेळी आवश्यकतेनुसार या केंद्रामार्फत तालुक्याच्या ठिकाणीही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागात उत्कृष्ट कार्य झाले असून सरासरी 97 टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. मलेरिया व डेंगू, तसेच चिकनगुनिया सारख्या आजारावर नियंत्रण व तात्काळ उपचार केल्यामुळे प्रभावी नियंत्रण शक्य झाले आहे. मलेरिया आजारासंदर्भात 33 लाख 76 हजार 117 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 459 बाधित रुग्ण आढळले आहेत.

राष्ट्रीय संसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक त्तवावर निवड करण्यात आलेल्या चार जिल्हयामध्ये भंडारा व वर्धा जिल्हयाचा समावेश करण्यात आला असून यामध्ये 10 उपकेंद्रावर या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. 30 वर्षावरील सर्वांची तपासणी करुन विविध आजारांच्या रुग्णांची नोंद करुन त्यांना आवश्यक औषधोउपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये मधुमेह, उच्चदाब व कर्करोग सारख्या आजाराचा समावेश आहे. डॉयबेटीक रेटिनोपेथीक तपासोउपचार या कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्हयात प्रायोगिक प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. याअतंर्गत 235 रुग्ण आढळले असून त्यापैकी 37 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विभागातील सर्व आरोगय संस्थांमध्ये मोफत उपचार उपलब्ध असून ज्या संस्था मोफत औषध देत नाही अशा संस्थाविरुध्द 104 या टोलफ्री क्रमांकावर रुग्णांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहनही डॉ. संजीव जयस्वाल यांनी केले.

सर्वांसाठी आरोग्य याअंतर्गत आरोग्य शिबीर
सर्वांसाठी आरोग्य याअंतर्गत राज्य शासन वैद्यकीय आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून उपचार करण्याच्या धोरणानुसार नागपूर विभागात मागील तीन वर्षात विविध तालुका तसेच जिल्हास्तरावर आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये 86 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून या तपासणीमध्ये आवश्यकता असलेल्या 4 हजार 590 रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत 34 लाख 12 हजार 858 रुग्णांचे स्कॅनिंग करण्यात आले असून 51 हजार 088 बाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांनाही आवश्यक औषधोउपचार सुरु असल्याची माहिती डॉ. संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिली.

मोफत निदान योजनेअंतर्गत विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 25 प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येतात. त्यासोबत ग्रामीण रुग्णालयात 33 तसेच जिल्हा रुग्णालय व महिला जिल्हा रुग्णालयात 45 प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

नागपूर विभागात जिल्हा रुग्णालय ते उपरुग्णालय असे 2 हजार 216 आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध असून या आरोग्य सुविधा केंद्रात 6 हजार 994 खाटा उपलब्ध आहेत. विभागात 84 टक्के अधिकारी ते कर्मचाऱ्याची पदे भरण्यात आली आहे. जिल्हयात 102 या टोलफ्री क्रमांकाच्या 405 रुग्णवाहिका असून ॲडवान्स लाईफ स्फोर्ट असलेल्या 107 रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत आहेत. त्‍यासोबत 20 डॉयलेसिस मशीनची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा 3 हजार 180 रुग्णांना लाभ झाला असल्याची माहिती डॉ. संजीव जयस्वाल यांनी दिली.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी संवाद या उपक्रमाबद्दलची भूमिका सांगितली. तसेच या उपक्रमाअंतर्गत आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांनी विभागातील आरोग्य सुविधांबद्दल माध्यम प्रतिनिधीसोबत संवाद साधल्याबद्दल आभार व्यक्त केले.

आरोग्य विभागाला विविध राज्यस्तरीय पुरस्कार
नागपूर विभागातील जिल्हा तसेच उपरुग्णालयांनी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांमध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरावर 12 पुरस्कार प्राप्त झाले आहे. राज्यात सर्वाधिक पुरस्कार नागपूर विभागाला मिळाले असून यामध्ये कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत राज्यातून प्रथम पुरस्कार उपजिल्हा रुग्णालय तिरोडा यांना 15 लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह व प्रश्तीपत्र मिळाले आहे.

कायाकल्प योजनेमध्ये राज्यातून तिसरा क्रमांक जिल्हा रुग्णालय वर्धा, तसेच डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय यांना प्रत्येकी 3 लक्ष रुपयाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यस्तरावर कुटूंब कल्याण कार्यक्रमात उल्लेखनिय कार्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना प्रथम पुरस्कार, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक यांना द्वितीय पुरस्कार, पुरुष नसबंदीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

कुटूंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांना राज्यातून तृतिय पुरस्कार, पुरुष नसबंदी जिल्हा शल्यचिकित्सक गडचिरोली यांना प्रथम पुरस्कार तसेच कुटूंब कल्याण कार्यक्रमाचा तिसरा पुरस्कार. पुरुष नसबंदीसाठी राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया, कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दुसरा पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा व कुटूंब कल्याण कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक यांना राज्यातून दुसरा पुरस्कार असे 12 पुरस्कार नागपूर मंडळाला यावर्षी मिळाले आहे.