
नागपूर: नागपूरात प्लॉटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी प्रखर शिशीरकिशोर तिवारी व त्याची आई निता तिवारी (रा. तिवारी नगर, कामठी) यांच्यावर कलम 318(2), 318(4), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार यशवंत गोंविदराव वाडीभस्मे (वय 24, रा. कोराडी) हा झोमॅटो कंपनीत काम करतो. त्याच्या वडिलांनी सेवेनिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम घरात जमा केली होती. आरोपी प्रखर तिवारी याने 2022 मध्ये त्याला व त्याच्या कुटुंबीयांना “प्लॉटमध्ये गुंतवणूक करा, काही दिवसांत दुप्पट पैसे मिळतील” असे सांगून विश्वासात घेतले. तिवारी नगर व भिलगाव येथील प्लॉटची 7/12 दाखवून त्याला खात्री दिली.
यानंतर वाडीभस्मे कुटुंबाने पंजाब नॅशनल बँकेतून आरोपीच्या खात्यात 25.50 लाख रुपये ऑनलाईन पाठवले, तर 34.50 लाख रुपये रोख दिले. काही दिवसांत फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ सुरू केली. या तणावातून तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीने थोडी रक्कम (सुमारे 25 लाख रुपये) परत केली, मात्र 35 लाख रुपये परत दिले नाहीत. अखेर तक्रारदाराने आरोपीकडून घेतलेले चेक बँकेत टाकले असता ते रक्कम नसल्याने बाऊन्स झाले. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज कोल्हे तपास करत असून, आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










