Published On : Mon, Nov 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

तुकडेबंदी कायद्याच्या जाचातून ५ हजार नागरिकांना दिलासा; नागपूर परिसरातील ९ गावांमधील जमीन व्यवहार नियमित होणार

Advertisement

Auto Draft

नागपूर : तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जमीनविषयक अडचणींचा सामना करणाऱ्या नागपूर ग्रामीण परिसरातील सुमारे ५,००० नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून बेसा, बेलतरोडी, विहीरगाव, नरसाळा, हुडकेश्वर (बु.), बहादुरा, खरबी, गोन्ही सिम आणि कापसी खुर्द या ९ गावांमधील जमिनींच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाने गती दिली आहे.

या गावांमधील विविध लेआऊटमधील जमिनींचे हस्तांतरण तसेच तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे हजारो भूखंडधारकांना खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद, फेरफार नोंदी आणि अन्य महसुली कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी, अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनींच्या मालकी हक्कासंदर्भातील महसुली नोंदी पूर्ण करून घेता येत नव्हत्या.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपंते आणि तहसीलदार, नागपूर (ग्रामीण) अरविंद हिंगे यांनी संबंधित जमिनींच्या अभिलेखांची तपासणी करून महाराष्ट्र धारण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियमातील लागू तरतुदींनुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना दिल्या आहेत.

Advertisement

या प्रक्रियेमुळे संबंधित ९ गावांमधील सुमारे ५,००० नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीनविषयक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. पात्र भूखंडधारकांच्या मालकी हक्काच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जमिनींचे व्यवहार, महसुली नोंदी आणि मालकी हक्कासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीनविषयक प्रश्नांच्या निराकरणाला गती मिळाली असून, नागपूर ग्रामीण परिसरातील ९ गावांमधील सुमारे ५,००० नागरिकांसाठी मालकी हक्काच्या नोंदी नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.