Published On : Tue, May 4th, 2021

पंतप्रधान आवास योजनेतील दिव्यांग लाभार्थीला मनपाने दिले ५० हजारांचे अनुदान

महापौरांच्या हस्ते धनादेश वितरित : अर्ज करण्याचे केले आवाहन

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वाठोडा येथे सदनिका प्राप्त झालेल्या अश्विनी सुनील कथलकर ह्या शारीरिक दिव्यांग मुलीला तरतुदीनुसार मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे ५० हजारांच्या अनुदान धनादेशाचे वितरण करण्यात आले.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते हा धनादेश अश्विनी कथलकर हिला प्रदान करण्यात आला. यावेळी गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, प्रकाश विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर, आकाश कथलकर उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेतील तरतुदीनुसार नगर रचना विभागाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने सदर अनुदान देण्यात आले.

नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध कल्याणकारी कार्याला गती मिळावी यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये ७.५० कोटी रूपये निधीचे प्रावधान करण्यात आले आहे. या राखीव निधीचे पूर्णपणे योग्य पदासाठी खर्च करण्याच्या नियोजनाच्या कार्यवाहीला गती देण्याच्या दृष्टीने महापौरांचे अध्यक्षतेखाली एक समिती गठित झाली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या २.५० लक्ष रुपयांसह मनपा ५० हजार रुपये अर्थसहाय्य करणार आहे. त्या अनुषंगाने नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतलेल्या दिव्यांग व्यक्तीला म.न.पा.तर्फे अर्थसाहय करण्यासाठी महापौरांनी याबाबत पुढाकार घेवून प्रथम लाभार्थी अश्विनी सुनील कथलकर हिला अर्थसाहाय्याचा धनादेश सुपुर्द केला.

दिव्यांगांनी अर्ज करावे : महापौर
नागपूर शहरातील ज्या दिव्यांगांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडी प्राप्त झाली आहे, सदनिका मंजूर झाली आहे अशा दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह मनपाकडे अर्ज करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. तरतुदीनुसार त्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.