नागपूर : वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचाराच्या रणधुमाळीमुळे सर्वच पक्षांचे नेते नागपुरात येत असल्यामुळे विमानतळावर वर्दळ वाढली आहे.
कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हेलिकॉप्टरचा वापर करीत आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान असल्यामुळे देशातील सर्वच राजकीय नेत्यांचा प्रचाराचा कल विदर्भात १० मतदार संघात वाढला आहे. नेते हेलिकॉप्टरने दौरे करीत आहेत. विदर्भात ९ एप्रिलपर्यंत प्रचार करण्याची मुभा असल्यामुळे आणखी नेते हेलिकॉप्टरचा उपयोग करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असउद्दीन ओवेसी यांनीही विदर्भात दौरे केले. या सर्व नेत्यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात प्रचार सभा घेतल्या.
विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती येथे विमानतळ आहेत. पण मोठे नेते विमानाने नागपुरात येतात आणि हेलिकॉप्टरने वेगवेगळ्या ठिकाणी जातात. भाजप, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने हेलिकॉप्टर खासगी कंपनीकडून भाड्याने घेतले आहे. २८ मार्चला चार, २९ मार्चला एक, ३० मार्चला पाच, ३१ मार्चला नऊ, १ एप्रिल १२, ३ एप्रिलला सात हेलिकॉप्टर विमानतळावर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
