
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, सातबारा कोरा आणि इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर-हैदराबाद महामार्गावर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्यासह तब्बल २,५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई हिंगणा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आंदोलकांनी सलग २४ ते ३० तास महामार्गावर बसून वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे हजारो वाहनं रांगेत अडकली आणि नागपूर ते वर्धा मार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, महामार्ग अडवून सार्वजनिक हालचालींना अडथळा आणणे, नागरिकांची गैरसोय करणे, तसेच पोलिसांना शिवीगाळ करणे यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.
आंदोलनासाठी प्रशासनाकडून केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानात परवानगी देण्यात आली होती. मात्र, आंदोलकांनी ठरावीक जागा सोडून थेट वर्धा महामार्गावर जाऊन चक्काजाम केला. पोलिसांच्या अहवालानुसार, नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन उपस्थित शेतकऱ्यांना चिथावणी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
२८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावर जवळपास दीड दिवस वाहतूक ठप्प राहिली. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर आंदोलकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होत बच्चू कडू यांनी “सरकार झोपलेलं आहे, जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं” असं वक्तव्य केलं होतं. मात्र, आता त्यांच्या या आंदोलनामुळे स्वतः त्यांच्याच अडचणीत भर पडण्याची चिन्हं दिसत आहेत.








