
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोधीपुरा परिसरात दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्की रिंकू साहू असे मृत मुलाचे नाव आहे.
साई मंदिराजवळील परिसरात साहू कुटुंबीय सुमारे महिनाभरापूर्वी भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले होते. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले लक्कीचे वडील पाणीपुरीचा व्यवसाय करतात. कुटुंबात तीन मुले आणि एक मुलगी असून लक्की सर्वांत लहान होता.
२० ऑगस्ट रोजी सकाळी लक्कीचे दोन भाऊ आणि बहीण शाळेत जाण्यासाठी खाली उतरले. त्यांना टाटा करण्यासाठी लक्की दुसऱ्या मजल्यावरील ग्रिलजवळ गेला आणि खाली वाकून पाहत असताना अचानक त्याचा तोल गेला. तो थेट जमिनीवर कोसळला.
घटनेनंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान लक्कीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे साहू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.




